(खेड /रत्नागिरी प्रतिनिधी)
खेड-दापोली मार्गावरील कुवे घाटात प्रवाशाला चाकूचा धाक दाखवत लुटल्याच्या धक्कादायक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील तिसरा संशयित अद्याप फरार असून, लुटीसाठी वापरण्यात आलेली वॅगनार कार पोलिसांनी जप्त केली आहे.
या प्रकरणी शाहरूख युसुफमिया कुरुपकर (३१, रा. रूखी, दापोली) आणि फाईज अकबर हुसेनी (२८, मुंबके, अंतुले मोहल्ला, खेड) यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयासमोर हजर केले असता दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर या गुन्ह्यातील सार्थक खेडेकर (महाडनाका) हा संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या प्रकरणी रोहन राजू तांबे (३०, रा. शिव खुर्द-बौद्धवाडी क्र. १, सध्या नगरपरिषद वसाहत, खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, ते दापोली बसस्थानकाबाहेर खेडकडे जाण्यासाठी खासगी वाहनाची प्रतीक्षा करत असताना एक वॅगनार कार त्यांच्या जवळ थांबली. चालकाने ‘खेडला येणार का?’ अशी विचारणा केल्यानंतर त्यांनी कारमध्ये प्रवेश केला. कुंभवे परिसरात पोहोचल्यानंतर संशयितांनी अचानक कार थांबवून फिर्यादीच्या पोटावर चाकू रोखत जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी त्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून मानसिक दबाव टाकल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर साखरोली येथील पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर संशयितांनी फिर्यादीचा मोबाईल ताब्यात घेतला. मोबाईलवरील डिजिटल पेमेंट अॅपचा वापर करून प्रथम २०० रुपये, त्यानंतर १ हजार रुपये आणि पुन्हा ५ हजार रुपये अशा टप्प्याटप्प्याने रकमा स्वतःच्या स्कॅनरवर वर्ग करून एकूण ६ हजार २०० रुपये उकळल्याचा आरोप आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान लुटीसाठी वापरण्यात आलेली वॅगनार कार पोलिसांनी शनिवारी जप्त केली असून, फरार संशयिताचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे करीत आहेत.

