(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने जनजीवनासह महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेलाही मोठा फटका बसला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्हाभरात वीज पायाभूत सुविधांचे सुमारे ४ कोटी ६२ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, एकूण १ लाख ६२ हजार ८१२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्ती मोहीम राबविल्यानंतर १ लाख ५४ हजार २५९ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून, उर्वरित भागात काम वेगाने सुरू आहे.
सततच्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी उच्चदाब आणि लघुदाब वीजवाहिन्यांवर मोठी झाडे कोसळली, वीज खांब उन्मळून पडले, तर अनेक रोहित्रांचेही नुकसान झाले. काही दुर्गम भागांमध्ये रस्ते बंद झाल्याने दुरुस्ती पथकांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी निर्माण झाल्या. प्रतिकूल परिस्थिती असूनही महावितरणचे अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी दिवस-रात्र शिफ्टमध्ये काम करत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
रत्नागिरी विभागात १८५ उच्चदाब खांबांपैकी १६४ खांब पूर्ववत करण्यात आले आहेत, तर ५८४ लघुदाब खांबांपैकी ५०६ खांबांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. नुकसानग्रस्त ३७ रोहित्रांपैकी २७ रोहित्रे पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहेत. या विभागात एकट्याचे १ कोटी ७९ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चिपळूण विभागात ६६ उच्चदाब खांबांपैकी ४६, तर २१० लघुदाब खांबांपैकी १६८ खांब पुन्हा उभारण्यात आले आहेत. तसेच २० पैकी १६ रोहित्रे कार्यान्वित करण्यात आली असून, या विभागात ६५ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. खेड विभागात वादळी पावसाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. येथे ३१० उच्चदाब खांबांपैकी १७० आणि ५९३ लघुदाब खांबांपैकी ३८३ खांबांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. तसेच २७ पैकी १९ रोहित्रे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. या विभागात २ कोटी १७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद महावितरणने केली आहे.
दरम्यान, दुर्गम आणि अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये अद्यापही दुरुस्तीचे काम सुरू असून, उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत वीज यंत्रणा पूर्वपदावर आणण्यासाठी कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत असल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत होत आहे.

