( सोलापूर )
मराठीतील सुपरहिट ‘सैराट’ चित्रपटातील ‘सल्या’ या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख सध्या कौटुंबिक संकटाचा सामना करत आहे. त्याच्या वडिलांवर सोलापूर येथील वळसंगकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या उपचारासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. उपचारासाठी आवश्यक आर्थिक मदत तातडीने उपलब्ध व्हावी या उद्देशाने 1 लाख रुपयांचा धनादेश नुकताच अभिनेता अरबाज शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
मंगेश चिवटे यांनी घेतली रुग्णालयात भेट
रविवारी सकाळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सोलापूरमधील वळसंगकर हॉस्पिटलला भेट देऊन अरबाज शेख आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अरबाज यांच्या वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
मंत्री उदय सामंत यांची तातडीची मदत
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोणताही विलंब न करता उपचारासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. त्यानुसार धनादेश तातडीने अरबाज शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ही मदत वळसंगकर हॉस्पिटलमधील उपचाराचा खर्च भागवण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
मदतीच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक
ऐन अडचणीच्या काळात एका उदयोन्मुख कलाकाराच्या कुटुंबाला आर्थिक आधार देत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. उपचारासाठी वेळेवर मिळालेली ही मदत अरबाज शेख यांच्या कुटुंबासाठी दिलासादायक ठरल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अरबाज शेख यांनी ‘सैराट’ चित्रपटातील ‘सल्या’ या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा शुभेच्छा चाहत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

