(पाली / रायगड)
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर पर्यटनबंदी असतानाही फिरण्यासाठी आलेल्या पुणे जिल्ह्यातील दोन तरुण पर्यटकांचा डोहात बुडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (12 जुलै) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. रविवारी बचाव कार्य सुरु असताना संध्याकाळी अंधार पडू लागल्यामुळे तसेच दुर्गम भागातील प्रतिकूल परिस्थितीमुळे आज (सोमवारी) सकाळी बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे गोपाळ राठोड आणि विष्णू डोके (वय अंदाजे 23 ते 25 वर्षे) अशी आहेत.
पावसाळी पर्यटनासाठी आले आणि दुर्घटना घडली
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही पुणे जिल्ह्यातील चाकण येथील एका खासगी कंपनीत काम करत होते. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कंपनीतील काही कर्मचारी देवकुंड धबधबा पाहण्यासाठी आले होते. मात्र, प्रशासनाने या परिसरात पर्यटनास स्पष्ट बंदी घातलेली असतानाही हा गट धबधब्याच्या परिसरात पोहोचला. यावेळी काही जण डोहात उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने गोपाळ राठोड आणि विष्णू डोके हे दोघे पाण्यात बुडाले. त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र डोह खोल असल्याने दोघेही पाण्यात बेपत्ता झाले.
अंधारामुळे रेस्क्यू ऑपरेशन थांबवले
घटनेची माहिती मिळताच स्थानिक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. मात्र संध्याकाळी अंधार पडू लागल्याने आणि दुर्गम परिसर तसेच प्रतिकूल हवामानामुळे रविवारी बचावकार्य सुरू करणे शक्य झाले नाही. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे जिवरक्षक सागर दहिंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवारी (13 जुलै) सकाळी प्रशिक्षित बचाव पथकाच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे.
30 सप्टेंबरपर्यंत पर्यटनावर पूर्ण बंदी
मानवी जीविताची सुरक्षा लक्षात घेऊन माणगाव उपविभागीय प्रशासनाने 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत देवकुंड धबधबा आणि परिसरात कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या कालावधीत पर्यटकांना धबधबा आणि डोह परिसरात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यापूर्वीही याच ठिकाणी अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही काही पर्यटक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.
सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंपासून सावध राहा
दरम्यान, इंस्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही ट्रॅव्हल एजंट आणि ट्रिप आयोजकांकडून “देवकुंड धबधबा पर्यटनासाठी खुला झाला आहे” अशा आशयाचे रिल्स आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात आहेत. मात्र, प्रशासनाने हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव देवकुंड धबधब्यावर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पर्यटनास पूर्ण बंदी कायम आहे.
ट्रिप आयोजकांवर कारवाईची मागणी
खोट्या जाहिराती आणि सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे अनेक पर्यटक जीव धोक्यात घालून प्रतिबंधित भागात जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. अशा प्रकारे पर्यटकांची दिशाभूल करणाऱ्या ट्रॅव्हल एजंट, टूर आयोजक आणि सोशल मीडिया पेज चालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी नागरिकांना पावसाळ्यात धबधबे, नद्या आणि खोल डोह असलेल्या प्रतिबंधित पर्यटनस्थळांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही व्हिडिओ किंवा जाहिरातींवर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित जिल्हा प्रशासन किंवा पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशांची खात्री करूनच पर्यटनाचा निर्णय घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

