( मुंबई )
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात गंभीर आरोप करत सुनेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गेल्या सात वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा तसेच अंधश्रद्धा आणि अघोरी प्रकार केल्याचा आरोप गिरीजा राऊत यांनी केला आहे.
या प्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात फिरोज बाबा नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून, इतर आरोपींच्या भूमिकेचा तपास सुरू आहे.
सुनेचे गंभीर आरोप काय?
गिरीजा राऊत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. सासरच्या कुटुंबाकडून आपला सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तक्रारीनुसार, आपल्याला जबरदस्तीने गोमूत्र पिण्यास भाग पाडण्यात आले, डोक्यावरील केस उपटून अघोरी प्रकार करण्यात आले, तसेच विविध धार्मिक विधी आणि कथित उपचारांच्या नावाखाली त्रास देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गिरीजा राऊत यांनी दावा केला आहे की, पती गितेश राऊत यांच्यासोबत वैवाहिक संबंधांबाबत समस्या होत्या. या विषयावर चर्चा केल्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही आणि त्यानंतर विविध भोंदूबाबांकडून अघोरी प्रकार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“सात वर्षे मानसिक आणि भावनिक छळ सहन केला”
पत्रकार परिषदेत बोलताना गिरीजा राऊत म्हणाल्या की, “गेली सात वर्षे माझा आर्थिक, मानसिक आणि भावनिक छळ सुरू होता. सासरचे कुटुंब राजकीय क्षेत्रातील असल्यामुळे आणि संसार टिकवण्याच्या उद्देशाने मी यापूर्वी तक्रार केली नाही.” त्यांनी पुढे आरोप केला की, “मला वेगवेगळ्या बाबांकडे नेले जायचे. अंगारे लावणे, कोंबडीच्या माध्यमातून विधी करणे, गोमूत्र पिण्यास भाग पाडणे अशा प्रकारांना सामोरे जावे लागले.” तसेच विवाहानंतर पतीने वैवाहिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ केली आणि याबाबत जाब विचारल्यावर शिवीगाळ, मारहाण तसेच मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. 2018 पासून त्यांच्यात आणि पतीमध्ये कोणतेही शारीरिक संबंध नव्हते. गणपतीनंतर मूल होण्यासाठी प्रयत्न करू, असं सांगितलं. मात्र, अनेक भोंदूबाबांना घरी बोलावून विविध धार्मिक कर्म केल्याचा आरोपही त्यांनी केला.
“सासऱ्यांनी कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली नाही”
गिरीजा राऊत यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्यावरही आरोप केले आहेत. विनायक राऊत हे वेगळे राहत असल्याचा दावा करत त्यांनी कुटुंबातील वाद सोडवण्यासाठी त्यांनी आवश्यक भूमिका घेतली नाही, असा आरोप केला. “कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी सासू आणि पतीला समजावून सांगण्याची भूमिका घेतली नाही,” असे गिरीजा राऊत यांनी म्हटले आहे.
गिरीजा राऊत यांचे वकील ॲड. सागर कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, विवाहापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी लपवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलाच्या वैयक्तिक समस्यांची माहिती असूनही लग्न लावण्यात आले आणि त्यानंतर मानसिक दबाव निर्माण करण्यात आला. याप्रकरणी फसवणुकीचा आरोपही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विनायक राऊत यांनी आरोप फेटाळले
दरम्यान, माजी खासदार विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप पूर्णपणे खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विनायक राऊत म्हणाले की, “गिरीजा गेल्या तीन वर्षांपासून गितेशसोबत राहत नाही. 2022 मधील कथित घटनेबाबत 2026 मध्ये तक्रार करण्यात आली आहे. यामागे काहीतरी वेगळा हेतू असण्याची शक्यता आहे.” त्यांनी पुढे आरोप केला की, घटस्फोटाच्या प्रकरणात मोठ्या आर्थिक मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र, त्या मागण्या मान्य न केल्याने खोटे आरोप करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला.
विनायक राऊत यांनी दावा केला की, गितेश राऊत यांनी अलीकडेच घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये तडजोडीबाबत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान 5 कोटी रुपये, 3BHK टेरेस फ्लॅट आणि इलेक्ट्रिक कारची मागणी करण्यात आल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला होता.
गिरीजाच्या आईचा पलटवार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी सुनेने केलेले सर्व आरोप फेटाळल्यानंतर आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. गिरीजा राऊत यांच्या आई पूजा पवार यांनी माध्यमांसमोर येत विनायक राऊत यांच्या दाव्यांना प्रत्युत्तर दिले आहे. राऊत यांनी केलेले पैशांच्या मागणीचे आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगत, आपल्या मुलीला दीर्घकाळ मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा दावा पूजा पवार यांनी केला आहे.
‘आम्हाला वाद वाढवायचा नव्हता’
पूजा पवार म्हणाल्या, आम्ही गेल्या तीन वर्षांपासून चर्चा करण्यासाठी आणि भेटीसाठी वेळ मागत होतो. आमचा उद्देश वाद वाढवण्याचा नव्हता, तर हा प्रश्न सामोपचाराने सोडवण्याचा होता. कुटुंबातील समस्या मिटवण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले, मात्र परिस्थितीत सुधारणा झाली नाही.
‘पैशांची मागणी केली नाही’
विनायक राऊत यांनी 5 लाख रुपये मासिक खर्च, 10 कोटी रुपये, घर आणि कारची मागणी करण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, पूजा पवार यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्या म्हणाल्या, “आम्हाला पैसे हवे असते तर आम्ही तीन वर्षे वाट पाहिली नसती. आम्हाला फक्त आमच्या मुलीचा संसार टिकावा, एवढीच इच्छा होती.”
‘शारीरिक संबंध नसतील तर मुलं कशी होणार?’
गिरीजा राऊत यांनी केलेल्या आरोपांचा उल्लेख करत पूजा पवार यांनी वैवाहिक जीवनाशी संबंधित प्रश्न उपस्थित केले. “शारीरिक संबंध होणार नाहीत तर मुलं होणार कशी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, मुलीला मानसिक त्रास देण्यात येत होता आणि फोनवर बोलतानाही काही वेळा स्पीकरवर बोलण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
गिरीजा राऊत यांच्या तक्रारीनुसार, 2016 मध्ये विवाह जुळविणाऱ्या संस्थेमार्फत त्यांचा आणि गितेश राऊत यांचा परिचय झाला होता. त्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर वैवाहिक संबंध, मानसिक छळ आणि अघोरी प्रकारांबाबत त्यांनी तक्रारीत माहिती दिली आहे
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणात कापूरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप केले आहेत. सध्या पोलिसांकडून तक्रारीतील आरोप, संबंधित पुरावे आणि सर्व व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी केली जात आहे. तपासानंतरच या प्रकरणातील सत्य स्पष्ट होणार आहे.
कापूरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अघोरी प्रकार केल्याबद्दल फिरोज बाबाला अटक केली असून, इतर आरोपींची भूमिका, तक्रारीतील आरोपांची सत्यता आणि संबंधित पुरावे याबाबत तपास सुरू आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गिरीजा राऊत यांचे वकील ॲड. सागर कदम यांनी केली आहे.

