(ठाणे)
महापालिकेच्या निकालानंतर कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले असून, ठाकरे गटाच्या चार विजयी नगरसेवकांच्या बेपत्तापणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून आलेले मधुर म्हात्रे यांनी शिवसेना नेते व खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले. त्याचवेळी दुसऱ्या विजयी उमेदवार कीर्ती ढोणे यांच्याशीही संपर्क होत नसल्याने संशय अधिक गडद झाला आहे. या पार्श्वभूमीवर दिलेल्या इशाऱ्यानुसार ठाकरे गटाने थेट ‘बेपत्ता नगरसेवक’ अशी पोस्टर्स शहरात लावून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
१६ जानेवारीपासून चार नगरसेवक नॉट रिचेबल
१६ जानेवारी रोजी मतमोजणी झाल्यानंतरपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चार विजयी नगरसेवक अद्याप नॉट रिचेबल आहेत. विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी ठाकरे गटाला ९ नगरसेवकांची कमतरता आहे. मनसेच्या ५ नगरसेवकांनी पाठिंबा दिला असला, तरी ठाकरे गटाचे हे चार नगरसेवक संपर्काबाहेर असल्याने राजकीय गणित अडचणीत आले आहे.
पोलिसांत तक्रार, तांत्रिक तपासाची मागणी
या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ‘नगरसेवक हरवले’ अशी तक्रार दाखल केली आहे. यानंतर खासदार संजय राऊत यांनी बेपत्ता पोस्टर लावण्याचा इशारा दिला होता, त्याप्रमाणे रविवारी (२५ जानेवारी) बेपत्ता पोस्टर लावण्यात आले.
गटनोंदणीवेळीही गैरहजेरी
कल्याण-डोंबिवली महापालिकेत ठाकरे गटाचे एकूण ११ नगरसेवक विजयी झाले आहेत. मात्र कोकण आयुक्तालयात गटनोंदणीसाठी केवळ ७ नगरसेवक उपस्थित राहिल्याने पक्ष नेतृत्वाने याची दखल घेतली आहे. उर्वरित या चार नगरसेवकांविषयी शंका अधिकच बळावली आहे.
‘अपहरण की दबाव?’ तपासाची मागणी
या नगरसेवकांच्या जीवाला धोका आहे का, की त्यांचे अपहरण झाले आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी केली आहे. यामध्ये सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपास करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
शहरभर बेपत्ता पोस्टर्स
रविवारी (२५ जानेवारी) मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर कल्याण-डोंबिवली शहरात लावण्यात आले. “हे नगरसेवक आढळल्यास शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेशी संपर्क साधावा,” असे आवाहन पोस्टरद्वारे करण्यात आले आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नगरसेवकांच्या कुटुंबीयांशीही संपर्क होऊ शकलेला नाही, मोबाईल बंद आहेत, त्यामुळे आधी पोलिसांत तक्रार आणि आता पोस्टरबाजीचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.

