(पुणे)
पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी भीमाशंकर विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून, या अंतर्गत सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत कामांमुळे मंदिर तीन महिन्यांसाठी भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाशिवरात्रीचा कालावधी 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यानही मंदिर बंदच राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.
नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता आहे. कुंभमेळ्याच्या काळात दररोज सुमारे एक लाख भाविक भीमाशंकर येथे दाखल होऊ शकतात, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने हा विकास आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्याअंतर्गत भाविकांसाठी सुरक्षित, सुयोग्य आणि सुसज्ज सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला असून, नवीन भव्य सभामंडप, सुरक्षित प्रवेश व निर्गमन व्यवस्था, पायरी मार्ग तसेच गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत.
सध्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर दगडी बांधकाम सुरू असून, मुख्य सभामंडप पूर्णपणे उतरवण्यात आला आहे. विद्यमान सभामंडप अपुरा पडत असल्याने नवीन आणि अधिक क्षमतेचा भव्य सभामंडप उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्याचबरोबर पायरी मार्गाचं कामही प्रगतिपथावर आहे. दररोज होणारी मोठी गर्दी आणि सुरू असलेल्या बांधकामाची व्याप्ती लक्षात घेता, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
प्रारंभी भाविकांच्या सोयीसाठी महाशिवरात्रीचा कालावधी वगळण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, सध्या सुरू असलेल्या कामाचा वेग, मोठ्या प्रमाणावर चालू असलेलं दगडी बांधकाम आणि बांधकाम साहित्य हलवण्यातील अडचणी पाहता, महाशिवरात्रीदरम्यान मंदिर उघडं ठेवणं सुरक्षिततेच्या दृष्टीनं शक्य नसल्याचं प्रशासनाच्या आढाव्यातून स्पष्ट झालं. त्यामुळे 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या काळातही मंदिर बंदच राहणार आहे.
यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले की, श्री क्षेत्र भीमाशंकर हा अतिवृष्टीचा प्रदेश असून, जून ते सप्टेंबरदरम्यान येथे मुसळधार पाऊस पडतो. या काळात बांधकाम करणे शक्य नसल्याने, उपलब्ध कालावधीत विकासकामे वेगाने पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचं गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

