(रायगड / पनवेल)
मान्सूनपूर्व काळात पावसाचे संकेत देणारा प्रसिद्ध ‘इंडियन पिट्टा’ अर्थात ‘नवरंग’ पक्षी कर्नाळा परिसरात दाखल झाला आहे. नवरंग पक्ष्याच्या आगमनामुळे निसर्गप्रेमी, पक्षी निरीक्षक आणि अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रंगीबेरंगी पिसे आणि मधुर आवाजासाठी ओळखला जाणारा हा पक्षी दरवर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस पावसाचे संकेत देण्यासाठी कर्नाळा जंगल परिसरात दिसून येतो. यंदाही त्याचे आगमन झाल्याने पावसाची चाहूल लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पहाटे आणि संध्याकाळी ऐकू येतो मधुर आवाज
पनवेलमधील पक्षी अभ्यासक माधव आठवले आणि समाधान पवार यांनी कर्नाळा परिसरात इंडियन पिट्टाचे निरीक्षण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पहाटे आणि संध्याकाळच्या वेळेत या पक्ष्याचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज ऐकू येत असल्याची माहिती त्यांनी दिली. जंगलातील ओलसर भाग, झाडाझुडपे आणि पानगळ झालेल्या परिसरात हा पक्षी अन्न शोधताना दिसून येतो. समाधान पवार हे या परिसरातील विविध पक्ष्यांचा सखोल अभ्यास करत असून त्यांच्या संवर्धनासाठीही प्रयत्नशील आहेत.
जमिनीवर जास्त वावर, आवाज मात्र लांबपर्यंत
नवरंग पक्षी रात्री झाडांवर विसावतो, मात्र दिवसभर त्याचा वावर जमिनीवर अधिक असतो. दाट जंगलात हा पक्षी पटकन नजरेस पडत नाही, पण त्याचा “व्हिट ट्यू” किंवा “व्हिट व्यू” असा दुहेरी आवाज सहज ओळखता येतो. या पक्ष्याचा विणीचा हंगाम पावसाळ्यात असतो. साधारण जून ते ऑगस्टदरम्यान तो घरटी बांधून अंडी घालतो. त्याची घरटी गोलाकार असून गवत आणि काटक्यांपासून बनवलेली असतात. ही घरटी बहुधा जमिनीवर किंवा झुडपांमध्ये खालच्या स्तरावर दिसून येतात.
शेतकऱ्यांसाठी पावसाचा नैसर्गिक संकेत
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी नवरंग पक्ष्याच्या आगमनाला पावसाचा नैसर्गिक संकेत मानतात. हा पक्षी दिसू लागला की, लवकरच पाऊस सुरू होणार असा अंदाज व्यक्त केला जातो. त्यानुसार खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन केले जाते.
श्रीलंकेपासून हिमालयापर्यंतचा प्रवास
Indian Pitta हा पक्षी हिवाळ्यात दक्षिण भारत आणि श्रीलंका येथे स्थलांतर करतो. तर पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रजननासाठी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत प्रवास करतो. अभ्यासकांच्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये दक्षिण भारत आणि श्रीलंकेतून स्थलांतर केलेले नवरंग पक्षी पश्चिम घाटाच्या मार्गाने उत्तरेकडे सरकतात. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ते कोकणात दाखल होतात. काही पक्षी गुजरात आणि उत्तर भागात प्रजननासाठी जात असले तरी काही पक्षी कोकणातही घरटी बांधतात.
‘नवरंग’ नावामागचं कारण काय?
इंग्रजीमध्ये ‘इंडियन पिट्टा’ म्हणून ओळखला जाणारा हा पक्षी मराठीत ‘नवरंग’ म्हणून प्रसिद्ध आहे. शरीरावर हिरवा, निळा, काळा, पांढरा आणि लाल अशा विविध रंगांच्या छटा असल्याने त्याला ‘नवरंग’ हे नाव मिळाले आहे. याची शेपटी लहान असते, डोळ्यांवर काळी पट्टी असते, पंखांवर आकाशी निळा ठिपका दिसतो आणि पोटाच्या भागात लालसर रंग असतो. तर ‘पिट्टा’ हा शब्द तेलुगू भाषेतून आला असून त्याचा अर्थ ‘लहान पक्षी’ असा होतो.

