( मुंबई )
पश्चिम विदर्भातील औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून अमरावती येथे पीएम टेक्सटाईल पार्कला मंजुरी देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये लॉजिस्टिक्स हब, क्लस्टर विकास आणि गुंतवणूक प्रोत्साहनासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेत सदस्य डॉ. परिणय फुके यांनी पश्चिम विदर्भातील औद्योगिक विकासासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत आमदार भावना गवळी यांनीही सहभाग घेतला.
फुके यांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे प्रश्न
-
विदर्भातील उद्योगांचा माल राज्याबाहेर विकला जात असल्याने त्यांना Growth GST किंवा पर्यायी प्रोत्साहन देण्यात येणार का?
-
पश्चिम विदर्भासाठी अधिक भांडवली अनुदान आणि अतिरिक्त GST परतावा देण्याचे धोरण राबवले जाणार का?
-
महिला, अनुसूचित जाती-जमाती आणि दिव्यांग उद्योजकांसाठी विशेष प्रोत्साहन पॅकेज जाहीर होणार का?
-
उद्योगांचे आधुनिकीकरण करण्यासाठी 25 टक्के भांडवली अनुदान देण्याबाबत शासनाची भूमिका काय?
उदय सामंत यांची माहिती
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, अमरावती येथील PM टेक्सटाईल पार्कसाठी जमीन दरामध्ये कपात करण्यात आली असून उद्योजकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
तसेच,
-
पश्चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये 100 एकर क्षेत्रावर लॉजिस्टिक्स हब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
अमरावती-बडनेरा परिसरात सुमारे 300 एकर क्षेत्रात प्रादेशिक लॉजिस्टिक्स हब विकसित करण्याचे काम प्रस्तावित आहे.
-
जिल्हा गुंतवणूक परिषदांच्या माध्यमातून अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
आमदारांची समिती स्थापन होणार
पश्चिम विदर्भातील उद्योगांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त सवलती, अनुदान आणि सुविधा देण्याबाबत विचार करण्यासाठी आमदारांचा समावेश असलेली विशेष समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही उदय सामंत यांनी जाहीर केले. उदय सामंत म्हणाले की, राज्यात ‘एक तालुका, एक क्लस्टर’ ही संकल्पना राबविण्यात येत असून आतापर्यंत 191 ठिकाणी क्लस्टर विकसित करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत उद्योगांना 30 ते 70 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.
ग्रामीण उद्योजकतेलाही चालना
ग्रामीण भागात उद्योजकता वाढविण्यासाठी ‘गाव तिथे एक उद्योजक’ ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूक्ष्म, लघु, मध्यम तसेच मोठ्या उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी उद्योग विभागाकडून जिल्हानिहाय दौरे करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

