(मुंबई)
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात उभारण्यात येत असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे काम गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून ठप्प होते. ट्रस्टची पुनर्रचना झाल्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्मारक स्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की 23 जानेवारी 2026 पर्यंत स्मारक पूर्ण होणे अशक्य असून ते 2027 मध्येच जनतेसाठी खुले केले जाईल.
उद्धव ठाकरे म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट अस्तित्वात नव्हता. आता नवीन नियुक्त्यांसह ट्रस्ट पुन्हा कार्यरत झाला आहे. आठ-नऊ महिन्यांनंतर कामाची विद्यमान स्थिती जाणून घेण्यासाठी मी येथे आलो. लवकरच ट्रस्टची बैठक घेऊन पुढील कामांना वेग देण्यात येईल.”
ठाकरे पुढे म्हणाले, “गेल्या काही महिन्यांपासून स्मारकाचे काम पूर्णपणे बंद होते. आता ते पुन्हा सुरू केले जाईल. 23 जानेवारीला काम पूर्ण होणे अशक्य आहे. मात्र पुढील वर्षी, म्हणजे 2027 मध्ये स्मारक निश्चितपणे पूर्ण होईल आणि त्यानंतर जनतेसाठी खुले करण्यात येईल.”
मागील शनिवारी राज्य सरकारने शासन निर्णयाद्वारे उद्धव ठाकरे यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांची मार्च 2020 मध्ये नियुक्ती झाली होती. त्यांचा कार्यकाळ मार्च 2025 मध्ये संपल्याने ट्रस्टची कामे रखडली.
नवीन निर्णयानुसार उद्धव ठाकरे : अध्यक्ष (पाच वर्षे), आदित्य ठाकरे : सदस्य, सुभाष देसाई : सचिव, पराग अळवणी (भाजपा) आणि शिशिर शिंदे (शिवसेना-शिंदे गट) : सदस्य (तीन वर्षे) तर मुख्य सचिव, नगर विकास प्रधान सचिव, विधी व न्याय प्रधान सचिव आणि मुंबई महापालिका आयुक्त हे पदसिद्ध सदस्य राहणार आहेत.
महायुती सरकारमधील भाजपा–शिवसेना (शिंदे गट) तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची पुनर्नियुक्ती झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गटातील नाराजीमुळे सरकारकडून शिवसेना (यूबीटी) ला अप्रत्यक्ष बळ मिळत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र शिवसेना (यूबीटी) ने म्हटले आहे की, बाळासाहेबांच्या स्मृतीशी संबंधित असलेल्या या स्मारकावर राजकारण करणे योग्य नाही.

