(मुंबई)
राज्य विधिमंडळाच्या 2026 मधील पावसाळी अधिवेशनाची शुक्रवारी सांगता झाली. तब्बल तीन आठवडे चाललेल्या या अधिवेशनाने संसदीय इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला. 9 जुलै रोजी विधानसभेचे कामकाज सलग 18 तास 10 मिनिटे सुरू राहून 10 जुलैच्या पहाटे 3.39 वाजता स्थगित करण्यात आले. राज्याच्या संसदीय इतिहासातील हे सर्वाधिक कालावधीचे सलग कामकाज ठरले.
22 जूनपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांच्या मिळून 14 बैठका झाल्या. दरम्यान, मुंबईतील अतिवृष्टीमुळे 6 जुलै रोजी दोन्ही सभागृहांचे कामकाज मर्यादित राहिले. मात्र, त्यानंतरच्या कामकाजात महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा करून अनेक निर्णय घेण्यात आले.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचा सांख्यिकीय आढावा सभागृहासमोर मांडला. विधानसभेत 14 दिवसांत एकूण 127 तास 54 मिनिटांचे प्रत्यक्ष कामकाज झाले. दररोजची सरासरी कामकाजाची वेळ 9 तास 8 मिनिटे इतकी राहिली. मंत्री अनुपस्थितीमुळे केवळ 25 मिनिटे, तर इतर कारणांमुळे 5 मिनिटे कामकाजाचा वेळ वाया गेला.
या अधिवेशनात विधानसभेत 22 शासकीय विधेयके मांडण्यात आली. त्यापैकी 21 विधेयके मंजूर करण्यात आली, तर एक विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्यात आले. याशिवाय 12 अशासकीय विधेयके चर्चेनंतर मागे घेण्यात आली. प्रश्नोत्तराच्या तासात 9,095 तारांकित प्रश्नांच्या सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी 410 प्रश्न स्वीकारण्यात आले, तर 58 प्रश्नांना प्रत्यक्ष उत्तरे देण्यात आली. तसेच 2,998 लक्षवेधी सूचनांपैकी 292 सूचना स्वीकारण्यात आल्या आणि 62 सूचनांवर सभागृहात चर्चा झाली. नियम 293 अंतर्गत प्राप्त झालेल्या सर्व पाच प्रस्तावांवरही चर्चा करण्यात आली.
अधिवेशनादरम्यान विधानसभेतील सदस्यांची कमाल उपस्थिती 84.96 टक्के, तर सरासरी उपस्थिती 75.26 टक्के इतकी नोंदविण्यात आली.
दरम्यान, राज्य विधिमंडळाचे पुढील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून नागपूर येथे होणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाकडे लागले आहे.

