( मुंबई )
मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरात 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीची अत्यंत निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दामूनगर परिसरात शुक्रवारी सकाळी तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत समतानगर पोलिसांनी तरुणीच्या 22 वर्षीय प्रियकराला अटक केली आहे. प्रेमसंबंध, संशय आणि लग्नाच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासातून समोर आला आहे.
शुक्रवारी (10 जुलै) सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास दामूनगरमधील डोंगराळ आणि निर्जन भागात एका अज्ञात तरुणीचा मृतदेह पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी समतानगर पोलिसांना दिली. माहिती मिळताच समतानगर पोलिसांचे पथक, गुन्हे शाखेचे अधिकारी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला आणि वैज्ञानिक पद्धतीने पुरावे गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली.
हा मृतदेह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) सीमेवरील लव्हगड परिसरालगतच्या वनक्षेत्रात आढळून आला होता. त्यामुळे सुरुवातीला हा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याबाबत गूढ निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान मृत तरुणीची ओळख पटली. त्यानंतर संशयाची सुई तिचा परिचित आणि प्रियकर असलेल्या सूरज वाघमारे (वय 22, रा. कांदिवली पूर्व) याच्याकडे वळली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याच्या जबाबात विसंगती आढळून आली. त्यानंतर अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन तरुणी आरोपी सूरज वाघमारे याच्याकडे लग्न करण्यासाठी सातत्याने आग्रह धरत होती. या मुद्द्यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्याचबरोबर तरुणी दुसऱ्या एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचा संशय आरोपीला होता. या संशयामुळे दोघांमधील वाद अधिक तीव्र झाले होते. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात तरुणीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपीने तिच्या गळ्यावर वार करून गळा चिरल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरील परिस्थिती अत्यंत भयावह होती. तरुणीच्या गळ्यावर खोल जखम होती, तर शरीराच्या विविध भागांवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या अनेक खुणा आढळून आल्या. विशेषतः छातीवर गंभीर जखमा असल्याने आरोपीने अत्यंत क्रूरपणे हल्ला केल्याचे स्पष्ट होत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
आतापर्यंतच्या तपासावरून पोलिसांचा असा अंदाज आहे की, आरोपीने हा गुन्हा पूर्वनियोजित पद्धतीने केला असावा. निर्जन वनक्षेत्रात तरुणीला बोलावून तिची हत्या करण्यात आली असण्याची शक्यता तपासली जात आहे. या हत्येमागे केवळ वैयक्तिक वाद कारणीभूत होता की अन्य कोणताही हेतू होता, याचाही पोलीस तपास करत आहेत.
तसेच आरोपीने हा गुन्हा एकट्याने केला की त्याला इतर कोणाची मदत मिळाली होती, याचाही शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळावरील सर्व तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांचे विश्लेषण सुरू असून, मोबाईल डेटा, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची पडताळणी केली जात आहे.
दरम्यान, मृत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण अधिक स्पष्ट होणार आहे. समतानगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

