(चिपळूण/ रत्नागिरी)
कोयना धरणातील पाण्यावर कोकणातील जनतेचा पहिला हक्क असून, कोकणाची पाण्याची गरज पूर्ण झाल्याशिवाय हे पाणी अन्यत्र वळवू देणार नाही, अशी ठाम भूमिका चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी मांडली आहे. कोकणातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबरोबरच रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे भौगोलिक मानांकन (जीआय) अबाधित राखण्यासाठीही एकजुटीने कायदेशीर लढा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या दोन्ही प्रश्नांवर आगामी हिवाळी अधिवेशनात आक्रमकपणे आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळविण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कोकणच्या पाणीहक्काचा मुद्दा ऐरणीवर आणला. कोकणातील अनेक भागांना आजही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना येथील गरजांकडे दुर्लक्ष करून पाणी अन्यत्र वळविणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. कोकणाची गरज भागविल्यानंतर उर्वरित अतिरिक्त पाण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा; मात्र स्थानिक जनतेच्या हक्काच्या पाण्याला प्रथम प्राधान्य मिळालेच पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. कोयनेचे पाणी कोकणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज खर्च करून पाणी उचलण्याऐवजी नैसर्गिक प्रवाहाचा वापर करून पाणी आणण्याचा पर्याय तपासला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत आयआयटीकडे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची जबाबदारी सोपविली आहे. धामणवणे आणि टेरव यांसारख्या ठिकाणी पाणी आणून तेथून खालच्या गावांमधील नळपाणी योजनांना त्याचे वितरण करण्याची संकल्पना विचाराधीन असल्याचे निकम यांनी सांगितले. या पर्यायातून कोकणातील पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाय शोधण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोकणचा पाणीहक्क आणि हापूसची भौगोलिक ओळख हे दोन्ही विषय प्रदेशाच्या भवितव्याशी आणि आर्थिक हिताशी निगडित आहेत. त्यामुळे या प्रश्नांवर शासनदरबारी ठोस भूमिका मांडण्याबरोबरच हिवाळी अधिवेशनातही त्यांचा पाठपुरावा करणार असल्याचा निर्धार आमदार निकम यांनी व्यक्त केला.
हापूसच्या मानांकनासाठी कोकणाने एकवटण्याची गरज
दरम्यान, रत्नागिरी आणि कोकणच्या हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकनाचा प्रश्नही निकम यांनी गांभीर्याने उपस्थित केला. रत्नागिरीच्या हापूसला मिळालेले स्वतंत्र भौगोलिक मानांकन कायम राहणे आवश्यक असून, वलसाड आणि जुन्नर येथेही आंब्याच्या मानांकनासंदर्भात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या विषयाकडे केवळ भावनिक नव्हे, तर कायदेशीर दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. रत्नागिरीच्या हापूसचे वेगळेपण, त्याची ओळख आणि त्यातून निर्माण झालेले बाजारमूल्य जपण्यासाठी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधी, आंबा उत्पादक आणि संबंधित घटकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे आवश्यक आहे. या प्रश्नावर एकजूट निर्माण करून कायदेशीर पातळीवर प्रयत्न करावे लागतील, असे आवाहनही त्यांनी केले.


