बालपणापासून मुलांवर संस्कार करणारे आई-वडील आणि त्यानंतर त्यांना आयुष्याची खरी दिशा देणारे मूर्तिकार म्हणजे शिक्षक. आणि असेच विद्यार्थ्यांचे लाडके, प्रेरणादायी व मार्गदर्शक शिक्षक म्हणजे ज्ञानोबा सोमवंशी सर, जे आज ३९ वर्षांचा प्रदीर्घ सेवाकाल पूर्ण करून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.
शिक्षक कधीच निवृत्त होत नाही. तो आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनावर आणि आयुष्यावर आपल्या ज्ञानाचा प्रकाश शेवटच्या श्वासापर्यंत पसरवत असतो. असेच ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे हाडाचे शिक्षक म्हणजे सोमवंशी सर.
शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ वाटचाल
ज्ञानोबा सोमवंशी सर यांनी तब्बल ३१ वर्षे धाराशिव जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये सेवा केली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा धाराशिव येथे ते पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. सन २०१७ मध्ये बदली होऊन ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील नांदिवली केळेवाडी शाळेत रुजू झाले. तेथे त्यांनी अल्पावधीतच पालक आणि ग्रामस्थांना आपलेसे केले.
गणित विषयातील खास प्रावीण्य
गणित विषयातील त्यांचा हातखंडा सर्वपरिचित होता. त्यांनी नांदिवली केळेवाडीतील अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसवून त्यांना यश मिळवून दिले. मुलांची परिस्थिती लक्षात घेऊन, गरज पडल्यास आर्थिक मदत करून, आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला योग्य दिशा देऊन त्यांनी अनेकांचे जीवन घडवले.
विद्यार्थ्यांशी समरस होणारे शिक्षक
सोमवंशी सर केवळ अभ्यासापुरते मर्यादित नव्हते. विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांमध्ये रमून, त्यांच्याशी जवळीक साधून त्यांनी त्यांना आत्मविश्वास आणि प्रेरणा दिली. शाळेतील कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन त्यांच्या कल्पक बुद्धीने सुसूत्रतेने पार पडत असे. शिक्षण परिषद असो वा सांस्कृतिक कार्यक्रम, त्यांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहामुळे प्रत्येक कार्यक्रम संस्मरणीय होत असे.
सामाजिक व संघटनात्मक कार्यात सहभाग
पुस्तकी ज्ञानाबरोबरच बाहेरील विशाल जगाचे व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेत कार्यरत राहून त्यांनी समितीला नेहमी बळकटी दिली. आंबवली विभाग हा शिक्षक समितीचा बालेकिल्ला राहावा यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले.
कर्तव्यदक्षतेचे मूर्तिमंत उदाहरण
शिक्षकी पेशा ही केवळ नोकरी नसून समाज घडवण्याचे महान कार्य आहे, या भावनेतून त्यांनी आपली सेवा बजावली. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून त्यांचे जीवन उजळवणारे आणि संघटनेशी प्रामाणिक राहून आदर्श शिक्षकाची ओळख निर्माण करणारे ज्ञानोबा सोमवंशी सर आज (३१ जुलै २०२५) शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.
त्यांच्या हातून ज्ञानदानाचे कार्य असाच अखंड सुरू राहो, आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
— शैलेश पराडकर
प्रवक्ता, शिक्षक समिती खेड