(चिपळूण / वार्ताहर)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय टेनिक्वाईड (रिंगटेनिस) स्पर्धेत परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूणच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत १४ आणि १७ वर्षे वयोगटांतील मुलींच्या संघांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले, तर १९ वर्षे वयोगटातील संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
१४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवत जिल्हास्तरीय विजेतेपदावर नाव कोरले. या संघात तन्वी साळवी, ईश्वरी घाटकर, मीरा हेलेकर, स्वरा जैन आणि आरोही शिंदे यांचा समावेश होता. या सर्व खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१७ वर्षे वयोगटातही युनायटेड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी आपले वर्चस्व सिद्ध केले. अनन्या गिरकर, श्रावणी हळदे, समृद्धी देर्देकर, इशिका आग्रे आणि रुद्रा शिंदे यांचा समावेश असलेल्या संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. या संघाचीही विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दरम्यान, १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला. या संघात आदिती जाधव, अनन्या जाधव, गौरी घाडी, जान्हवी कलकुटकी आणि शर्वरी गमरे यांचा समावेश होता.
विजयी संघातील खेळाडूंना क्रीडा अधिकारी सुनील कोळी यांनी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थिनींना क्रीडा प्रमुख समीर कालेकर, माजी विद्यार्थी निखिल वारके आणि गायत्री सोळुंके यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेचे मुख्याध्यापक संजय बनसोडे, उपमुख्याध्यापिका रेवती कारदगे, पर्यवेक्षक खाडे व मुंढेकर, परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, चिपळूण शहरातील नागरिक आणि पालकांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.


