(खेड / वार्ताहर)
राज्यात यंदा दुष्काळाचे सावट असून बळीराजा मोठ्या संकटाचा सामना करत आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी यंदा दिवाळी आणि आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. सण-उत्सवांवरील खर्च टाळून तो निधी बळीराजाच्या मदतीसाठी आणि सामाजिक उपक्रमांसाठी वापरण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येत्या २९ नोव्हेंबर रोजी ॲड. वैभव खेडेकर यांचा वाढदिवस आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा वाढदिवसाचा कोणताही उत्सव न करण्याचे त्यांनी ठरविले आहे. आगामी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत खेड तालुक्यात पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाढदिवसाचे औचित्य साधत तालुक्यातील गरजू गावांमध्ये २५ वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. ज्या गावांमध्ये वनराई बंधाऱ्यांची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी स्वखर्चाने बंधारे बांधून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
या उपक्रमामुळे भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न हाताळण्यास मदत होईल, तसेच दुष्काळ निवारणासाठी लोकहिताची सकारात्मक चळवळ उभी राहण्यास हातभार लागेल, असा विश्वास ॲड. खेडेकर यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आगामी दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी नागरिक, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या दुष्काळ निवारणाच्या प्रयत्नांना सर्वांनी खांद्याला खांदा लावून साथ द्यावी. लोकसहभागातूनच या संकटावर प्रभावीपणे मात करणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
यंदाची दिवाळी आणि वाढदिवस उत्सव म्हणून नव्हे, तर समाजसेवेचे पर्व म्हणून साजरे करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. बळीराजाला मदतीचा हात देण्यासोबतच भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी २५ वनराई बंधारे उभारण्याचा हा उपक्रम जनसेवेसाठी समर्पित असल्याचे ॲड. वैभव खेडेकर यांनी सांगितले.


