(खेड / वार्ताहर)
पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत मुरवण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत वरवली अंतर्गत येणाऱ्या गावठण वाडीतील ग्रामस्थ आणि महिलांनी एकजुटीने जलसंधारणाचा स्तुत्य उपक्रम राबवला. सर्वांनी श्रमदानातून राजन ओढ्यावर वनराई बंधारा उभारला असून, या उपक्रमातून पाण्याचे संवर्धन आणि भूजल पातळी वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या उपक्रमात गावातील महिलांनी विशेष पुढाकार घेतला. घरगुती आणि शेतीची कामे सांभाळत महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बंधाऱ्याच्या बांधकामात सहभाग नोंदवला. ओढ्याच्या पात्रात वाळूची पोती भरणे, तसेच दगड आणि मातीची रचना करणे अशा विविध कामांमध्ये ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. संपूर्ण गावाने एकजुटीने काम केल्यामुळे अवघ्या काही तासांत बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले.
उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई कमी करण्यासाठी हा बंधारा उपयुक्त ठरणार आहे. राजन ओढ्यातून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा जमिनीत मुरण्यास मदत होईल. परिणामी, परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास हातभार लागणार आहे. याचा फायदा आगामी काळात रब्बी आणि उन्हाळी पिकांना होण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठीही मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
शासकीय अनुदान किंवा मदतीची प्रतीक्षा न करता ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत गावाच्या पाणीप्रश्नावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. गावाच्या विकासासाठी दाखवलेली सामूहिक इच्छाशक्ती, एकजूट आणि महिलांचा सक्रिय सहभाग यामुळे वरवलीच्या गावठण वाडीतील या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामस्थांनी श्रमदानातून राबवलेला हा जलसंधारणाचा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.


