(खेड / वार्ताहर)
मुंबई-रत्नागिरी मार्गावरील भरणे नाका येथे मध्यरात्री गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोला वॅगनआर कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात कारमधील एका पुरुषासह दोन महिला जखमी झाल्या असून, त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भरणे नाका येथील वारकरी मठासमोर हा अपघात झाला. पेन येथून गणेशमूर्ती घेऊन साखरपा परिसराच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनआर कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की वॅगनआरची दिशा बदलून ती मुंबईच्या दिशेने वळली. तर टेम्पो काही अंतर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला थांबला.
या धडकेत टेम्पोमधून नेण्यात येत असलेल्या गणेशमूर्तींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वॅगनआरमधून रोहन बाळकृष्ण बाळसराफ, सोनल चव्हाण आणि कोमल शिर्के प्रवास करत होते. हे तिघे बदलापूरहून गणपतीपुळेकडे जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अपघातानंतर जखमी तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

