(रत्नागिरी)
सन २०२६-२७ मधील कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कडधान्य पिकांचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने ‘काढणीपश्चात पायाभूत सुविधा प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट’ या घटकासाठी आर्थिक सहाय्याची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार असून, इच्छुकांनी २५ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
या योजनेत प्रत्यक्ष झालेल्या बांधकाम खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल २५ लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी या योजनेअंतर्गत एक लाभार्थीचा लक्षांक निश्चित करण्यात आला असून, शेतकरी उत्पादक संघ (FPO), शेतकरी उत्पादक कंपनी, प्राथमिक कृषी पतसंस्था तसेच वैयक्तिक अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक अटी व कागदपत्रे
बँक कर्ज मंजुरी आवश्यक : ही योजना बँक कर्जाशी संलग्न असल्याने अर्जदारांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना व नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीयीकृत बँकेत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतरच संबंधित अर्जदार लाभासाठी पात्र ठरेल.
ऑडिट अहवाल : शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी आणि प्राथमिक कृषी पतसंस्थांनी मागील दोन वर्षांचे लेखापरीक्षण (ऑडिट) अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.
जमिनीची कागदपत्रे : संबंधित संस्थांनी तसेच वैयक्तिक अर्जदारांनी ७/१२ आणि ८-अ उतारा सादर करणे आवश्यक आहे.
वैयक्तिक अर्जदारांसाठी अटी : अर्जदाराचे वय किमान २१ वर्षे पूर्ण असावे. तसेच एका कुटुंबातील (स्वतः, पती/पत्नी आणि अविवाहित मुले) केवळ एका व्यक्तीलाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह २५ जुलै २०२६ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

