(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात डिजिटल बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्राहकांकडून तब्बल १,०१५ कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार नोंदविले आहेत. यामध्ये UPIद्वारे ७९१ कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून, ग्रामीण आणि दुर्गम भागातील ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणावर डिजिटल बँकिंगचा स्वीकार केल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
ग्राहकांना आधुनिक, सुरक्षित आणि सुलभ बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा बँकेने मागील काही वर्षांत डिजिटल सेवांचा सातत्याने विस्तार केला आहे. ATM, मोबाइल बँकिंग, UPI, IMPS, QR Code आणि QR Sound Box यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्राहकांना कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणाहून सहज बँकिंग व्यवहार करता येत आहेत.
जिल्हा बँकेच्या बहुतांश शाखा ग्रामीण व दुर्गम भागात कार्यरत असल्याने या भागातील ग्राहकांना डिजिटल बँकिंगच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बँकेने विशेष प्रयत्न केले आहेत. डिजिटल व्यवहारांचे प्रात्यक्षिक, ग्राहक मेळावे, ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिरे, डिजिटल साक्षरता अभियान तसेच फिरत्या ATM व्हॅनद्वारे प्रचार व सेवा यामुळे डिजिटल व्यवहारांबाबत ग्राहकांचा विश्वास आणि सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे.
ग्राहकांच्या व्यवहारांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी बँकेने SMS Alert सुविधा उपलब्ध करून दिली असून, प्रत्येक व्यवहाराची माहिती तात्काळ मोबाईलवर मिळत असल्याने ग्राहकांना खात्यावर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होत आहे. तसेच सायबर सुरक्षेसाठी २४x७ निरीक्षण व्यवस्था कार्यरत ठेवण्यात आली आहे.
चालू आर्थिक वर्षात (१ एप्रिल ते ३० जून २०२६) नोंदविलेले डिजिटल व्यवहार पुढीलप्रमाणे आहेत :
मोबाइल बँकिंग : ३.०४ कोटी रुपये
UPI : २६८.१० कोटी रुपये
QR Code : ८.२९ कोटी रुपये
IMPS : १७.३२ कोटी रुपये
ATM : ३४.०९ कोटी रुपये
याबाबत बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे म्हणाले, “रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ७६ शाखांमार्फत जिल्ह्यातील ग्राहक आणि शेतकऱ्यांना विविध बँकिंग सेवा पुरवत आहे. ग्राहकांना जलद, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा मिळाव्यात यासाठी डिजिटल सुविधांचा सातत्याने विस्तार करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांनाही आधुनिक बँकिंग सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी बँक कटिबद्ध आहे. डिजिटल व्यवहारांमुळे ग्राहकांचा वेळ आणि खर्च वाचत असून व्यवहार अधिक सुरक्षित झाले आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार भविष्यात आणखी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँक प्रयत्नशील राहील. सध्या बँकेकडून १९ ATM केंद्रे आणि ३ फिरत्या ATM व्हॅनद्वारे सेवा दिली जात असून, लवकरच AEPS (आधार आधारित पेमेंट प्रणाली) सेवेचाही शुभारंभ करण्यात येणार आहे.”
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्राहकाभिमुख सेवा, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सुरक्षित डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अग्रणी भूमिका बजावत आहे. भविष्यातही डिजिटल बँकिंगचा अधिकाधिक विस्तार करून ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
यावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी बँकेच्या विविध कर्ज योजना, ठेव योजना तसेच डिजिटल सेवा-सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही बँकेच्या वतीने करण्यात आले.

