(खेड / वार्ताहर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर कशेडी घाटातील धामणदेवी गावाजवळ आज (सोमवारी, २८ सप्टेंबर) रोजी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास ओल्या माशांनी भरलेला कंटेनर कलंडल्याची घटना घडली. अलिबागहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारा हा कंटेनर अपघातानंतर रस्त्यावर कलंडला. दरम्यान, कंटेनरच्या डिझेल टँकजवळून धूर निघू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील वाहतूक एकेरी करण्यात आली.
अपघाताची माहिती ११२ क्रमांकावर मिळाल्यानंतर पोलादपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी चालकाला अॅम्ब्युलन्सच्या मदतीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डिझेल टँकजवळून धूर निघत असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन महाड एमआयडीसी तसेच महाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
रामेश्वर साळुंखे यांनी अॅम्ब्युलन्स, पोलादपूर पोलीस तसेच अग्निशमन बंबांना अपघाताची माहिती देऊन घटनास्थळी बोलावले. महाड एमआयडीसीच्या अग्निशमन बंबाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर कलंडलेला कंटेनर रस्त्याच्या बाजूला उभा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जेसीबीच्या मदतीने कंटेनर हटविण्याचे काम करण्यात आले.
अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनीही खबरदारी घेतली. वाहतूक पोलिसांनी अन्नपूर्णा हॉटेलपासून वाहतूक गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वळवली होती. सुमारे दीड तासानंतर कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला.


