(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
‘जनरेशन-झेड’ अर्थात Gen Z या तरुण मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाने विशेष टीमची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मंत्र्यांना विद्यापीठे आणि सरकारी शाळांमध्ये जाऊन तरुणांशी थेट संवाद वाढविण्याच्या सूचना केल्यानंतर पक्षाने हे पाऊल उचलले आहे. तरुणांच्या अपेक्षा, प्रश्न, चिंता आणि बदलत्या राजकीय विचारविश्वाचा अभ्यास करून त्यांच्याशी अधिक प्रभावीपणे जोडले जाणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
या विशेष टीममध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी आणि विनोद तावडे यांच्यासह गुजरात सरकारमधील मंत्री हर्ष सांघवी आणि छत्तीसगड सरकारमधील मंत्री ओ. पी. चौधरी यांचा समावेश करण्यात आला आहे. टीममध्ये आणखी काही नेत्यांना जबाबदारी देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
तरुणांशी थेट संवाद साधण्यावर भाजपचा या मोहिमेत विशेष भर असणार आहे. पक्षाच्या पारंपरिक प्रचारपद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने Gen Z Outreach Programme राबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिक्षण, रोजगार, करिअरच्या संधी, स्टार्टअप, तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल क्षेत्रातील संधी यांसह तरुणांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध विषयांवर संवाद साधला जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत १४ ते २५ वयोगटातील तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून तरुणांचे विचार, त्यांच्या चिंता, गरजा आणि अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच तरुणांना भाजपच्या नेत्यांशी थेट संवाद साधून आपले प्रश्न आणि भूमिका मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
कार्यक्रमांचे स्वरूप, वेळापत्रक आणि ठिकाणांची माहिती पक्षाकडून लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यापीठे, महाविद्यालये आणि सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये तरुणांशी संवाद साधण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या ६५ सदस्यीय नवीन राष्ट्रीय टीमची पहिली बैठक दिल्लीतील भाजप मुख्यालयात पार पडली. या बैठकीत ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरही चर्चा झाली. काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’मधील केवळ दोन कडवी गाण्याच्या निर्णयाचा भाजपने निषेध केला.
राजकीय सोय किंवा लांगुलचालनासाठी ‘वंदे मातरम्’च्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका भाजपने या बैठकीत मांडली. देशभरात ‘वंदे मातरम्’च्या वारशाचे जतन आणि जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
एकीकडे Gen Z मतदारांशी थेट संवाद वाढविण्याची रणनीती आणि दुसरीकडे ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावर देशव्यापी मोहीम, अशा दुहेरी दिशेने भाजपने आपल्या नव्या राष्ट्रीय टीमच्या माध्यमातून पुढील राजकीय वाटचालीची तयारी सुरू केली आहे.

