(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे आज (गुरुवारी, 22 जानेवारी) रोजी माघी यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. ‘स्थानिकांची यात्रा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माघी यात्रेसाठी भाविकांचा प्रचंड जनसागर उसळला होता. हजारो स्थानिक भाविकांनी श्रींच्या दर्शनाबरोबरच यात्रेतील खरेदीचा मनसोक्त आनंद घेतला.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपतीपुळे तसेच भंडारपुळे, नेवरे, कोतवडे, मालगुंड, वरवडे, भगवतीनगर, खंडाळा, जयगड, जाकादेवी आदी परिसरासह संपूर्ण रत्नागिरी तालुका व जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. भाविकांनी शिस्तबद्धपणे दर्शन रांगांमध्ये उभे राहून श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर यात्रेतील विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.
माघी यात्रेच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे देवस्थान समितीने अत्यंत नेटके नियोजन केले होते. पहाटे पाच वाजता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. प्रारंभी मुख्य पुजारी अमित घनवटकर यांच्या हस्ते श्रींची पूजा, मंत्रपुष्प आणि आरती झाल्यानंतर दर्शनास सुरुवात करण्यात आली.
ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, पार्किंग आदी सुविधा चोखपणे उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच मंदिर परिसर, समुद्रकिनारा आणि गर्दीच्या ठिकाणी जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या यात्रेनिमित्त सांगली जिल्ह्यातील माघी गणेश मंडळाच्या वतीने भाविकांसाठी मोफत महाप्रसाद व बुंदी लाडूचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. एसटी महामंडळाने गणपतीपुळे मार्गावर जादा बससेवा उपलब्ध करून दिल्याने रत्नागिरी जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांना मोठी सोय झाली.
यात्रेसाठी जिल्ह्यातील तसेच घाटमाथ्यावरील अनेक व्यापारी विविध वस्तूंची दुकाने घेऊन दाखल झाले होते. त्यामुळे भाविकांना आवश्यक वस्तूंची खरेदी करण्याची संधी मिळाली आणि यात्रेला मोठ्या गर्दीचे स्वरूप आले.
सायंकाळी साडेचार वाजता गणपती मंदिराच्या प्रदक्षिणामार्गे श्रींची पालखी मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य स्वरूपात काढण्यात आली. या मिरवणुकीत देवस्थान समितीचे सरपंच निलेश कोल्हटकर, सर्व पंच, पुजारी, कर्मचारी, पोलीस बांधव, स्थानिक ग्रामस्थ तसेच भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला.
एकूणच माघी यात्रा उत्सव भक्तिभावात, सुरळीत आणि शांततेत पार पडावा यासाठी देवस्थान समिती, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.

