(संगमेश्वर / एजाज पटेल)
गुन्हेगारांविरुद्ध कठोर भूमिका घेणाऱ्या पोलिसांच्या खाकी वर्दीमागे एक संवेदनशील मनही दडलेले असते, याची प्रचिती लांजा तालुक्यातील एका प्रसंगातून आली. पडवण ते पन्हळे मार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या दुर्मिळ भारतीय सरड्याचा (चॅमेलियन) जीव वाचवण्यासाठी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी धावत्या वाहतुकीत वाहने थांबवून त्याला सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने जाण्यास मदत केली. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
क्षणाचाही विलंब न करता घेतला निर्णय
शासकीय कामानिमित्त पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे पडवण ते पन्हळे मार्गावरून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या नजरेस रस्त्याच्या मध्यभागी संथ गतीने रस्ता ओलांडणारा दुर्मिळ भारतीय सरडा दिसला. धावत्या वाहनांमुळे त्या मुक्या जीवाचा जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ वाहन थांबवण्याचे निर्देश दिले.
वाहतूक थांबवून दिला सुरक्षित मार्ग
वाहनातून उतरून बगळे यांनी दोन्ही बाजूंनी येणारी वाहने काही काळ थांबवली आणि सरड्याला सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. सरडा सुरक्षितपणे रस्त्याच्या पलीकडील झाडीत पोहोचेपर्यंत ते स्वतः तेथे उभे राहून त्याचे संरक्षण करत होते.
निसर्गप्रेमाची जपली आठवण
या प्रसंगादरम्यान बगळे यांनी त्या दुर्मिळ सरड्याचा व्हिडिओही आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. सुरक्षितपणे जंगलात पोहोचलेल्या त्या मुक्या जीवाला पाहून उपस्थितांनीही समाधान व्यक्त केले.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
पोलीस निरीक्षक बगळे यांच्या या संवेदनशील कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, “खाकी वर्दीतील माणुसकी” म्हणून नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. वाढत्या वाहतुकीमुळे अनेक वन्यजीव रस्त्यावर अपघातग्रस्त होत असताना, त्यांच्या या कृतीतून वन्यजीव संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेशही समाजापर्यंत पोहोचला आहे.
‘त्या मुक्या जीवाला वाचवणे हेही आमचे कर्तव्य’
या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे म्हणाले, “पोलीस म्हणून आम्ही दररोज अनेक कठोर निर्णय घेतो आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम करतो. मात्र, एखादा निष्पाप मुका जीव संकटात दिसला तर त्याचे प्राण वाचवणे हेही आपले कर्तव्यच आहे. त्या सरड्याला सुरक्षितपणे झाडीत जाताना पाहून मिळालेले समाधान शब्दांत व्यक्त करता येणार नाही.”

