(रत्नागिरी / वार्ताहर)
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभाग आणि डी.बी.जे. स्वायत्त महाविद्यालय, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने ५९ व्या युवा महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली एकदिवसीय जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. उत्तर आणि दक्षिण रत्नागिरी विभागातील ३६ महाविद्यालयांमधील ३९ प्राध्यापक तसेच ११० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी न. ए. सोसायटीचे व्हाइस चेअरमन दीपक विखारे, डी.बी.जे. स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. बापट, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव, मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे, डॉ. आनंद आंबेकर, डॉ. संतोष मराठे, डॉ. राजेश राजम, अमोल बावकर आणि डॉ. राहुल पवार उपस्थित होते. दीपप्रज्वलन, नटराज पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन आणि श्रीफळ वाढवून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
प्रास्ताविकात निलेश सावे यांनी युवा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि भविष्यातील करिअरसाठीही महत्त्वाचा मंच असल्याचे सांगितले. युवा महोत्सवातून अनेक नामवंत कलाकार आणि गुणवान व्यक्तिमत्त्वे घडल्याचे त्यांनी नमूद केले.
प्राचार्य डॉ. एम. एस. बापट यांनी सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांना शुभेच्छा देत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळत असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात दीपक विखारे यांनी कला, संस्कृती आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी युवा महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यशाळेत मयूर मगरे, तुषार शिरसाट, साहिल जोशी, मानस साखरपेकर, अमोल बावकर आणि निलेश सावे यांनी मार्गदर्शक (साधन व्यक्ती) म्हणून विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता पिसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. राहुल पवार यांनी केले. महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन करून कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.

