(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘रत्नागिरी ते पंढरपूर सायकलवारी’ या अनोख्या उपक्रमाला आज (शुक्रवारी) पहाटे ५ वाजता श्री विठ्ठल मंदिर येथून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. ३० हून अधिक सायकलपटूंनी या वारीत सहभाग घेतला असून, विठ्ठल नामाचा गजर करत भक्ती, शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत ही सायकलवारी पंढरपूरकडे रवाना झाली.
सायकलवारीचा शुभारंभ श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे कोषाध्यक्ष प्रमोद रेडीज, कार्यवाह राजन फाळके तसेच हॉटेल व्यावसायिक गणेश धुरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अशोक मयेकर, उपाध्यक्ष आनंद मराठे, विजय पेडणेकर यांच्यासह विश्वस्त मंडळी उपस्थित होती. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात सायकलपटूंना शुभेच्छा देत वारीला निरोप देण्यात आला.
या सायकलवारीत क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, उपाध्यक्ष दर्शन जाधव, सचिव डॉ. नितीन सनगर, खजिनदार योगेश मोरे, कार्यकारिणी सदस्यांसह विशाल भोसले, योगेश सामंत, प्रसाद देवस्थळी, प्रसाद खेडेकर, राकेश होरंबे, वरद चुनेकर, अमित पोटफोडे, गजानन भातडे, ज्ञानेश्वर पांडे, पूजा कोसुंबकर, विनायक पावसकर, अमित जोशी, मृणाल वाडेकर, ओंकार फडके, निलेश शाह, मंगेश शिंदे, नारायण पाटोळे, अक्षय पोटफोडे, राहुल भोसले, अथर्व शेंड्ये, संतोष तावडे, विनायक कुऱ्हाडे, विकास कांबळे, स्नेहल भिसे, किरण चुंबळकर, तेजस ढवळे आणि ॲड. सचिन नाचणकर सहभागी झाले आहेत.
यंदाच्या वारीचे विशेष आकर्षण म्हणजे क्लबमधील अवघ्या २० वर्षांचा सर्वात तरुण सदस्य आणि ७४ वर्षीय ज्येष्ठ सायकलपटू यांचा उत्साहपूर्ण सहभाग. वय हा केवळ आकडा असून श्रद्धा, जिद्द आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचा प्रेरणादायी संदेश या सहभागातून देण्यात आला आहे.
सुमारे ३३० किलोमीटरचा हा प्रवास तीन दिवसांत पूर्ण केला जाणार आहे. पहिल्या दिवशी उंब्रज (भोसलेवाडी) येथे मुक्काम झाल्यानंतर शनिवारी सायंकाळपर्यंत सायकलपटू पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी पोहोचणार आहेत. त्यानंतर रविवारी आयोजित सायकल रिंगणात ते सहभागी होणार असून, या सोहळ्यात महाराष्ट्रभरातील पाच हजारांहून अधिक सायकल वारकरी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
ही सायकलवारी केवळ धार्मिक यात्रा नसून ‘भक्ती, शक्ती आणि पर्यावरण’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम आहे. विठ्ठल भक्तीतून आत्मिक समाधान, सायकलिंगद्वारे शारीरिक व मानसिक सुदृढता आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचा प्रसार करून हरित भविष्यासाठी जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
मुग्धा सामंत यांची माऊली चरणी गायनसेवा
दि. ११ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता पंढरपूर येथे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सदस्या व प्रसिद्ध गायिका सौ. मुग्धा भट-सामंत विठ्ठल भक्तिरसाने ओतप्रोत अशी विशेष गायनसेवा सादर करणार आहेत. त्यांच्या या भक्तिमय सादरीकरणाची वारकरी आणि रसिकांमध्ये उत्सुकता आहे.

