(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहायक लेखा अधिकारी सिद्धार्थ शेट्ये यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने ही कारवाई केली.
११ सप्टेंबर रोजी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शेट्ये यांच्यासह तिघांना रंगेहाथ पकडले होते. लेखापरीक्षण अहवालातील प्रलंबित मुद्दे वगळण्यासाठी लाच मागण्यात आली होती, अशी तक्रार दापोली पंचायत समितीतील एका सहायक लेखा अधिकाऱ्याविरोधात दाखल झाली होती. त्यानंतर एसीबीने सहायक संचालक शरद जाधव यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचला.
या कारवाईदरम्यान, कंत्राटी शिपाई सतेज घवाळीने तक्रारदाराकडून १६ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर ही रक्कम तात्काळ सहायक लेखा अधिकारी सिद्धार्थ शेट्ये यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने घवाळी, शेट्ये व आणखी एका व्यक्तीस रंगेहाथ अटक केली.
या गंभीर घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने शेट्ये यांच्यावर निलंबनाची कारवाई करत कठोर पाऊल उचलले. या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराविरुद्ध प्रशासन किती सजग आहे, हे या कारवाईतून अधोरेखित झाले आहे.

