(संगमेश्वर / प्रतिनिधी)
“हाताला चटके बसल्याशिवाय भाकर मिळत नाही,” ही म्हण म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग समजून आपले आयुष्य जगणारे कोसूंब (ता. संगमेश्वर) येथील राजेंद्र मनोहर पोटफोडे यांनी शिक्षण अर्धवट राहिले तरी जिद्द, परिश्रम आणि अंगभूत कलेच्या जोरावर स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडविले आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या तांबट व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत त्यांनी केवळ स्वतःचीच नव्हे, तर आपल्या कलेचीही राज्यभर वेगळी ओळख निर्माण केली आहे.
राजेंद्र पोटफोडे यांच्या घराण्यात तांब्या-पितळेच्या भांड्यांना आकार देण्याचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या सुरू आहे. त्यांचे आजोबा आणि वडील दिवसभर भट्टीसमोर उभे राहून हातोड्याच्या प्रत्येक घावातून सुंदर भांडी घडवत असत. लहानपणापासून हे काम पाहताना त्यांना ही कला एखाद्या जादूप्रमाणे वाटायची. शाळेतील पुस्तकांपेक्षा भट्टीजवळील काम आणि वडिलांच्या हातातील कौशल्य त्यांना अधिक आकर्षित करत होते.
घरच्यांच्या आग्रहामुळे त्यांनी तिसरीपर्यंत शिक्षण घेतले; मात्र त्यानंतर त्यांनी कायमस्वरूपी तांबट व्यवसायाची वाट निवडली. वडिलांना मदत करताना त्यांच्या मनात एकच विचार होता, “हा वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेण्याची जबाबदारी आपलीच आहे.”
तांबट व्यवसाय हा अत्यंत कष्टाचा आणि संयमाची कसोटी पाहणारा व्यवसाय आहे. भट्टीची तीव्र उष्णता, हाताला बसणारे चटके आणि दिवसभराचे श्रम यामुळे अनेकजण या व्यवसायापासून दूर राहतात. मात्र राजेंद्र यांनी या अडचणींना कधीच घाबरून न जाता त्यांच्याशी मैत्री केली. मेहनतीच्या जोरावरच या व्यवसायात यश मिळू शकते, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
त्यांचे मोठे आणि धाकटे बंधू चालक व्यवसायात स्थिरावले. मात्र राजेंद्र यांनी पारंपरिक व्यवसायालाच आपले आयुष्य वाहण्याचा निर्णय घेतला. काळानुरूप बदल आवश्यक असल्याची जाणीव झाल्याने त्यांनी १९८२ ते १९९१ या कालावधीत कोल्हापूर येथे जाऊन तांबट व्यवसायातील आधुनिक तंत्रांचे प्रशिक्षण घेतले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी कौशल्य विकसित करण्यावर भर दिला.
सन १९९१ मध्ये ते पुन्हा आपल्या मूळ गावी कोसूंब येथे परतले आणि नव्या जोमाने व्यवसाय सुरू केला. तांबे-पितळेची विविध भांडी तयार करणे, जुन्या भांड्यांना कल्हई करणे, त्यांना नवा आकार देणे आणि पॉलिश करून नव्यासारखे बनविणे या कामात त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे ग्राहकांचा विश्वास वाढत गेला आणि छोट्या व्यवसायाचे रूपांतर हळूहळू एका सुसज्ज कारखान्यात झाले.
आज राजेंद्र पोटफोडे संसारोपयोगी तांबे-पितळेची विविध भांडी, मुस्लिम परंपरेतील विशेष प्रकारची भांडी तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार सानुकूल भांडी तयार करतात. प्रत्येक वस्तूमध्ये त्यांची कलात्मकता आणि बारकाई स्पष्टपणे दिसून येते.
देवस्थानांसाठी आवश्यक असलेली हनुमान गदा, शिवलिंग, अभिषेक पात्र, साळुंकी, नाग, पणत्या, तांब्याचे ताट, विविध पूजासाहित्य, पखवाज, दागिन्यांच्या पेट्या तसेच अनेक प्रकारची धार्मिक आणि पारंपरिक भांडी त्यांनी तयार केली आहेत. याशिवाय जुन्या तांबे-पितळेच्या भांड्यांना नव्यासारखे झळाळून टाकणारे पॉलिश आणि कल्हईचे कामही त्यांच्या कारखान्यात केले जाते.
राजेंद्र यांच्या कामाची गुणवत्ता आणि विश्वासार्हता यामुळे संगमेश्वरपुरती मर्यादित राहिलेली त्यांची ओळख आता पुण्यासह राज्यातील विविध शहरांपर्यंत पोहोचली आहे. मंदिरे, धार्मिक संस्था, व्यापारी तसेच सर्वसामान्य ग्राहकांकडून त्यांना सातत्याने ऑर्डर्स मिळत असतात. प्रत्येक कामात दर्जा आणि वेळेचे पालन हीच त्यांची खरी ओळख बनली आहे.
भट्टीसमोर उभे राहून आगीच्या झळा सहन करत, हातावर चटके बसत असतानाही आपल्या कलेवरील प्रेम त्यांनी कधी कमी होऊ दिले नाही. शिक्षण कमी असले तरी कौशल्य, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर आयुष्यात मोठे यश मिळवता येते, हे त्यांनी आपल्या जीवनातून सिद्ध करून दाखवले आहे.
आज राजेंद्र पोटफोडे हे केवळ यशस्वी कारागीर नसून पारंपरिक तांबट कलेचे जतन करणारे आणि पुढील पिढीसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात आहेत.
संपर्क : राजेंद्र मनोहर पोटफोडे
मोबाईल : ९६७३५५३९६०

