( रत्नागिरी )
शहरालगतच्या चंपक मैदानातील सुमारे ४० गुंठे जागा टाटा स्किल सेंटरसाठी देण्यात आली असून, याठिकाणी सुरु होणाऱ्या विकासकामांसाठी आता अडथळा ठरत असलेल्या अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून १५ दिवसांच्या आत अतिक्रमण हटवण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न हटविल्यास, एमआयडीसीकडून ती जागा बळकावून अतिक्रमण हटवले जाणार असून, संबंधित खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाणार आहे.
या जागेतील सुमारे ७ ते ८ गुंठ्यांमध्ये घरं व गॅरेज असल्याचे समोर आले आहे. ही जागा अनेक वर्षांपूर्वी स्टरलाईट कंपनीला दिली गेली होती. मात्र स्थानिक विरोधामुळे कंपनीने राज्याबाहेर कूच केली, पण जागेवरचा ताबा मात्र सोडला नव्हता. त्यानंतर एमआयडीसी आणि स्टरलाईट यांच्यात न्यायालयीन प्रक्रिया सुरु होती. अलीकडेच या खटल्याचा निकाल एमआयडीसीच्या बाजूने लागल्याने, वादग्रस्त जागा पुन्हा एमआयडीसीच्या ताब्यात आली आहे.
या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या टाटा स्किल सेंटरच्या कामाचे भूमिपूजनही पार पडले असून, सध्या लाईनआऊटची कामे सुरू आहेत. मात्र, अतिक्रमणामुळे पुढील कामांमध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अतिक्रमण तातडीने हटविण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
दरम्यान, हे प्रकरण पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यता लक्षात घेता, एमआयडीसीकडून कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. शहराच्या औद्योगिक आणि शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पासाठी चंपक मैदानातील जागा लवकरच अतिक्रमणमुक्त होणार असल्याची शक्यता आहे.