(रत्नागिरी)
राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठांतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी, शोभिवंत मत्स्य शेतकरी ट्रस्ट आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शोभिवंत माशांसाठी जिवंत खाद्य निर्मिती’ या विषयावरील राज्यस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातील ५० हून अधिक शोभिवंत मत्स्यपालक, मत्स्य उद्योजक, संशोधक, विद्यार्थी आणि मत्स्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन दरवर्षी १० जुलै रोजी साजरा केला जातो. भारतीय मत्स्यपालन क्षेत्रात प्रेरित प्रजनन तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग करून गोड्या पाण्यातील मत्स्यपालनात क्रांती घडवून आणणारे प्रा. डॉ. हिरालाल चौधरी आणि डॉ. के. एच. अलीकुन्ही यांच्या कार्याच्या स्मरणार्थ भारत सरकारने २००१ पासून हा दिवस राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन म्हणून घोषित केला आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. डॉ. हिरालाल चौधरी आणि प्रा. डॉ. के. एच. अलीकुन्ही यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व्यासपीठावर प्रा. डॉ. एम. एम. शिरधनकर, डॉ. केतनकुमार चौधरी, डॉ. आसिफ पगारकर तसेच मत्स्य व्यवसायिकांचे प्रतिनिधी फहद जमादार (हर्णे, दापोली) आणि राजकुमार कोळी (सोलापूर) उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. आसिफ पगारकर यांनी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचा इतिहास, संशोधन व विस्तार कार्य तसेच मत्स्य शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे महत्त्व स्पष्ट करत कार्यशाळेची उद्दिष्टेही त्यांनी मांडली.
प्रमुख पाहुणे डॉ. एम. एम. शिरधनकर यांनी शोभिवंत मत्स्यपालनामध्ये जिवंत खाद्याचे महत्त्व, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि मत्स्य व्यवसायातील उद्योजकीय संधी यावर मार्गदर्शन केले. यशस्वी मत्स्यपालनासाठी दर्जेदार जिवंत खाद्याची उपलब्धता अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. केतनकुमार चौधरी यांनी मत्स्य शेतकऱ्यांना दरवर्षी किमान एकदा विद्यापीठ किंवा संशोधन केंद्राला भेट देऊन ‘ज्ञानवारी’ करण्याचे आवाहन केले. यामुळे आधुनिक संशोधन, नवीन तंत्रज्ञान आणि सुधारित उत्पादन पद्धतींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, तसेच शास्त्रज्ञांनाही शेतकऱ्यांच्या गरजांनुसार संशोधन करण्यास दिशा मिळेल, असे त्यांनी सांगितले. मत्स्यशेतीसाठी दर्जेदार जिवंत खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी संशोधन केंद्र कायम तत्पर राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
तांत्रिक सत्रात शोभिवंत माशांच्या प्रजनन व संगोपनातील जिवंत खाद्याचे महत्त्व, पिल्लांच्या पोषण गरजा, समुद्री सूक्ष्म शैवाल संवर्धन, इन्फ्युझोरिया व रोटीफर संवर्धन, मोइना, डॅफ्निया, ट्युबिफेक्स, ब्लडवर्म, ब्लॅक सोल्जर फ्लाय (BSF), मीलवर्म, ग्रिंडल वर्म आणि मायक्रोवर्म संवर्धन तंत्रज्ञान या विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रायोगिक सत्रात जिवंत खाद्यांची ओळख आणि आर्टेमिया उबवणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.
कार्यशाळेच्या शेवटी सहभागी शेतकरी, मत्स्य उद्योजक आणि विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांशी संवाद साधून विविध शंकांचे निरसन करून घेतले. सर्व सहभागींचे सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अपूर्वा सावंत यांनी केले, तर प्रा. सचिन साटम यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यशाळेस डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अतुल मोहोड आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे विद्यार्थी तसेच आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.
राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त आयोजित ही राज्यस्तरीय कार्यशाळा शोभिवंत मत्स्यपालन क्षेत्रातील आधुनिक जिवंत खाद्य निर्मिती तंत्रज्ञानाचा प्रसार करून मत्स्य व्यवसायाच्या शाश्वत विकासाला निश्चितच चालना देणारी ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

