(संगमेश्वर / प्रतिनिधी)
देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात लवकरच ‘अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान’ या विषयावर आधारित स्वतंत्र संग्रहालय दालन साकारण्यात येणार आहे. या दालनाच्या माध्यमातून जागतिक तसेच भारतीय अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा रोमांचक प्रवास विद्यार्थी व नागरिकांसमोर उलगडला जाणार असल्याची माहिती विज्ञान केंद्राचे संस्थापक तथा देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली.
या संग्रहालयात जागतिक आणि भारतीय अवकाश संशोधनाचा इतिहास २५ प्रमाणबद्ध एक्झिबीट्स (मॉडेल्स) आणि माहितीपूर्ण पॅनेल्सच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. अवकाश विज्ञानातील महत्त्वाच्या मोहिमा, तांत्रिक प्रगती आणि संशोधनाची अद्ययावत माहितीही येथे उपलब्ध करून दिली जाणार आहे.
संग्रहालयात विक्रम लँडर, मंगलयान, क्रायोजेनिक इंजिन, गगनयान, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (ISS), अपोलो-११, क्युरिऑसिटी मार्स रोव्हर यांसारख्या विद्यार्थ्यांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये कुतूहल निर्माण करणाऱ्या आकर्षक मॉडेल्सचा समावेश असेल.
या दालनाच्या उभारणीसाठी सुमारे ३० ते ३२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या उपक्रमामुळे कोकणातील हजारो विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञानाची ओळख होण्याबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बौद्धिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास सदानंद भागवत यांनी व्यक्त केला.

