(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी–नागपूर महामार्गावरील आंबा घाटात पहाटे घडलेल्या भीषण अपघाताने अखेर शोकांतिकेचे रूप धारण केले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संगमेश्वर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अपघाताचे नेमके कारण अद्यापही गूढच आहे.
संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटातील गोवरेवाडी बसथांब्याजवळ गुरुवारी पहाटे हा भीषण अपघात घडला होता. सुरेश शामराव साळोखे (वय ६६) हे आपल्या रिक्षातून प्रवास करत असताना हा अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, साळोखे गंभीर जखमी झाले होते. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
हा अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक तपासात अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. साखरपा पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही छाननी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या दुर्घटनेमुळे आंबा घाट परिसरातील वाहतूक सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. सध्या मिऱ्या–नागपूर महामार्गावरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, या मार्गावरील भरधाव वाहतूक आता प्रवाशांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. विशेषतः अवजड वाहनांचा वाढता वेग आणि निष्काळजीपणे होणारी वाहतूक यामुळे लहान वाहनचालकांचा प्रवास अक्षरशः धोकादायक बनला आहे. महामार्गावरून धावणारे ट्रक, कंटेनर आणि इतर मोठी वाहने वेगमर्यादेचा विचार न करता भरधाव धावत असल्याचे चित्र सातत्याने दिसून येते. घाट परिसर, वळणावळणाचे रस्ते आणि मर्यादित दृश्यमानता असतानाही काही चालकांकडून बेदरकार वाहनचालना केली जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका दुचाकी, रिक्षा आणि छोट्या चारचाकी वाहनांना बसत आहे.
अपघात घडल्यानंतर अनेकदा धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार होत असल्याने तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहत आहे. धडक नेमकी कोणत्या वाहनाने दिली, अपघाताची दिशा काय होती किंवा चालक कोण होता, याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळण्यापूर्वीच संबंधित वाहन दूर निघून गेलेले असते. त्यामुळे अपघातग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवणे कठीण ठरत आहे.
महामार्गालगत सीसीटीव्ही यंत्रणांचा अभाव, अपुरी प्रकाशव्यवस्था आणि काही ठिकाणी आपत्कालीन मदत पोहोचण्यास होणारा विलंब या बाबीही चिंतेत भर घालत आहेत. त्यामुळे या मार्गावर आधुनिक निगराणी यंत्रणा, वेगनियंत्रण प्रणाली आणि नियमित पोलीस गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. अपघात रोखण्यासाठी केवळ प्रशासनाच्या उपाययोजना पुरेशा नसून वाहनचालकांनीही जबाबदारीची जाणीव ठेवून वाहतूक नियमांचे पालन करणे तितकेच आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

