(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून, जिल्ह्यासाठी ३० खाटांच्या अत्याधुनिक एकात्मिक आयुष रुग्णालयाला (Integrated AYUSH Hospital) राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १०.५० कोटी रुपये (१,०५० लाख) निधी मंजूर करण्यात आला आहे. या रुग्णालयासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
उद्यमनगर येथे उभारले जाणार रुग्णालय
महाराष्ट्र शासनाच्या आयुष विभागाने राज्यातील धुळे, सातारा, वाशीम, नांदेड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांमध्ये एकात्मिक आयुष रुग्णालये उभारण्यासाठी एकूण ६६ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यासाठी १०.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
रत्नागिरी शहरातील महिला रुग्णालयाजवळील उद्यमनगर परिसरात उपलब्ध जागेवर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयाचा लाभ जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनाही सहज घेता येणार आहे.
एकाच छताखाली विविध उपचार पद्धती
या एकात्मिक आयुष रुग्णालयात नागरिकांना विविध उपचार पद्धतींची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये, आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी या उपचार पद्धतींसह आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि रुग्णाभिमुख सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आयुष आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, नागरिकांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचार मिळू शकतील.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले की, “या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आयुष उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून, जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळेल.”

