(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा लोकवस्तीत आणि मुख्य रस्त्यांवर वाढलेला वावर ग्रामस्थांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. या चर्चेला बुधवारी मध्यरात्री घडलेल्या एका प्रत्यक्ष घटनेने दुजोरा मिळाला असून, पाळीव मांजरावर बिबट्याने झडप घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रसंगात शाहिद्दीन पावस्कर हे थोडक्यात बचावले.
बुधवारी मध्यरात्री डिंगणी येथील ‘मोहल्ला’ परिसरात हा प्रकार घडला. शाहिद्दीन पावस्कर हे घराबाहेर उभी असलेली दुचाकी ताडपत्रीने झाकण्यासाठी बाहेर आले होते. त्याचवेळी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. त्यांच्या सोबत त्यांचे पाळीव मांजरही बाहेर आले होते.
याच संधीचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने मांजरावर अचानक झडप घातली. समोरच बिबट्या दिसताच शाहिद्दीन पावस्कर यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजामुळे बिबट्या दचकला आणि मांजराला सोडून तेथून पळ काढला. या गोंधळात मांजरही सुखरूप सुटले, तर शाहिद्दीन पावस्कर यांनी तातडीने घरात धाव घेत स्वतःचा बचाव केला.
या घटनेनंतर डिंगणी गावात सुरू असलेल्या बिबट्याच्या वावराच्या चर्चांना पुष्टी मिळाली आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना पहाटे आणि सायंकाळी शेतात जावे लागते. अशा परिस्थितीत बिबट्याचा लोकवस्तीतील वाढता वावर ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने परिस्थितीची दखल घ्यावी, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक त्या ठिकाणी पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. वेळीच उपाययोजना केल्यास संभाव्य अनर्थ टाळता येईल आणि ग्रामस्थांना सुरक्षितपणे वावरता येईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

