(संगमेश्वर / एजाज पटेल)
रहायला आलेल्या ग्राहकांचा जोरजोरात बोलण्याचा आवाज रूम बाहेर येत होता. याबाबत हॉटेल चालकाने त्यांना रूम बाहेर बोलवून जोरात बोलू नका असे बोलल्याचा राग आल्याने त्यातील एकजण त्या हॉटेल चालकाच्या अंगावर धावून गेला व तुला काय करायचे आहे ते कर, अशा पद्धतीने वाद घातला. या किरकोळ वादाचे रूपांत हाणामारी व गाडीच्या नुकसानीपर्यंत पोहचले. फिल्मस्टाईल शोभेल असा हा वाद संगमेश्वर कट्टा ते फैसाफंड पर्यंत घडला.
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गवरील गोळवली येथे हॉटेल संगमेश्वर कट्टा येथे अतुल सोपान मानकर, बाळासाहेब सुरेश काळभोर, विजय कैलास आग्रे, तेजस्विनी बाळासाहेब काळभोर, दीपाली विजय आग्रे, वनिता अतुल मानकर सर्व राहणार पुणे जिल्ह्यातील असून हे संगमेश्वर कट्टा या हॉटेल मधील 102, 103, 107 असे रूम बुक करून रविवार 29 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 च्या सुमारास रहायला आले होते.
हे सर्वजण काल रात्री उशिरा हॉटेलच्या बुक केलेल्या रूम नंबर 107 मध्ये एकत्रित जमा होऊन जोरजोरात बोलत होते. जोरजोरात बोलण्याचा आवाज रूम बाहेरपर्यंत येत होता. याबाबत हॉटेल चालक निलेश परशुराम कांबळे (मूळ राहणार मुंबई लालबाग सध्या राहणार गोळवली) याने त्यांना रूम बाहेर बोलवून रूम मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज बाहेर येतोय जोरात बोलू नका अशी विनंती केली. याचा राग बाळासाहेब सुरेश काळभोर याला आल्याने तुला काय करायचे आहे ते कर, असे म्हणत असे म्हणत निलेश कांबळे यांच्या अंगावर धावत जाऊन मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागला.
हा वाद विकोपास जाईल असे वाटल्याने निलेश कांबळे हा आपल्या बरोबर हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करणारा नितीन चंद्रकांत मोहिते व वॉचमन बुद्धदास देवजी गमरे यांना स्वतः बरोबर घेऊन अल्टो गाडीने मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाने संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास जात असताना फिल्मी स्टाईल शोभेल असा अतुल सोपान मानकर याने आपल्या मालकीच्या असलेल्या एनेव्हा गाडीने पाठलाग करत राष्ट्रीय महामार्गांवरील फैसाफंड शाळेसमोर अतुल कांबळे यांच्या अल्टो गाडीसमोर एनेव्हा आडवी घालून गाडी अडवली.
थरारक पाठलाग करून अल्टो गाडी थांबवल्याने निलेश कांबळे व त्याच्या सोबतीला असलेल्या वेटर नितीन मोहिते आणि वॉचमन बुद्धदास गमरे हे चांगलेच भयभीत झाले होते. त्यांना काय होतोय हे कळण्यापूर्वीच अतुल मानकर याने एनोव्हा गाडीतून बाहेर पडत अल्टो गाडीच्या काचेवर दगड मारला, तर अन्य त्याच्याबरोबर असलेल्या महिला व पुरुषांनी सुद्धा गाडीचे नुकसान करून व शिवीगाळ करत मारहाण केली, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
रात्री 1.30 वाजता राष्ट्रीय महामार्गांवर सुरु असलेल्या या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पो. कॉ. मनवळ,सिद्ध आंब्रे, सतीश कोलगे, सोमनाथ आव्हाड, म्हस्कर, महिला पोलीस नीलम सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना ताब्यात घेऊन कार्यवाई सुरु केली. पो. नी. अमित यादव यांच्या मार्गदर्शनाने अधिक तपास पो. उप. नी. चंद्रकांत कांबळे करत आहेत.