(कोल्हापूर / अकोला)
बनावट सोन्याच्या नाण्यांच्या आमिषाने कोल्हापूर येथील एका हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 15 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील नांदखेड फाटा येथे उघडकीस आला आहे. घर पाडताना साडेतीन किलो सोन्याची नाणी सापडल्याची बनावट कथा सांगून आरोपीने विश्वास संपादन केला आणि कमी किमतीत नाणी विकण्याचे आमिष दाखवत हा कट रचल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोल्हापूरचे हॉटेल व्यावसायिक युवराज चोंदोबा कांबळे यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.
फोनवरून संपर्क साधत रचला फसवणुकीचा डाव
तक्रारीनुसार, आरोपी गणेश इंगळे याने युवराज कांबळे यांना फोन करून घर पाडताना आपल्या नातेवाईकाला एक भरणी सापडली असून त्यामध्ये साडेतीन किलो सोन्याची नाणी असल्याचे सांगितले. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने, “मी तुमच्या कोल्हापूरमधील हॉटेलमध्ये एकदा जेवायला आलो होतो,” असे सांगत ओळखीचा आधार घेतला. त्यानंतर बाजारभावापेक्षा कमी दरात ही नाणी 50 लाख रुपयांत विकण्याची तयारी असल्याचे सांगून कांबळे यांना व्यवहारासाठी तयार केले.
आरोपीने कथित सोन्याच्या नाण्यांचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले. व्यवहारापूर्वी विश्वास बसावा म्हणून एक नाणे तपासणीसाठी दिले. ते नाणे सोनाराकडे तपासले असता खरे असल्याचे समोर आले. त्यामुळे आरोपीवर कांबळे यांचा पूर्ण विश्वास बसला.
घरातील सोने तारण ठेवून उभे केले 15 लाख
विश्वास बसल्यानंतर युवराज कांबळे कोल्हापूरहून अकोल्यातील पातूर येथे पोहोचले. 4 जुलै रोजी नांदखेड फाटा परिसरात दोघांमध्ये व्यवहार झाला. तक्रारीनुसार, या व्यवहारासाठी कांबळे यांनी घरातील सोने तारण ठेवून बँकेतून गोल्ड टर्म लोन घेत 15 लाख रुपये रोख उभे केले आणि ते आरोपीकडे दिले. पैसे स्वीकारल्यानंतर आरोपीने सुमारे 3 किलो 300 ग्रॅम वजनाची कथित सोन्याची नाणी कांबळे यांच्या ताब्यात दिली.
तपासणीत उघड झाला मोठा घोटाळा
व्यवहार पूर्ण झाल्यानंतर नाण्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यावेळी संपूर्ण माल बनावट असल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कांबळे यांनी आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीचे सर्व मोबाईल क्रमांक बंद असल्याचे आढळून आले. यानंतर आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; तातडीच्या कारवाईचे आदेश
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला पातूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तक्रार स्वीकारली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी थेट अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी पातूर पोलीस ठाण्याला तातडीने गुन्हा दाखल करण्याचे, आरोपींना तीन दिवसांत अटक करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे तसेच फसवणुकीतील मुद्देमाल जप्त करण्याचे निर्देश दिल्याची माहिती तक्रारदाराने दिली.
फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
या घटनेनंतर युवराज कांबळे यांनी आरोपींवर कठोर कारवाई करून आपले 15 लाख रुपये परत मिळावेत, तसेच भविष्यात अशा प्रकारे इतर कोणाचीही फसवणूक होऊ नये, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पातूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

