(संगमेश्वर / एजाज पटेल)
रत्नागिरी जिल्ह्यात ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील वीज यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले. अनेक ठिकाणी उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांवर झाडे कोसळणे, इन्सुलेटर व इतर उपकरणांचे नुकसान होणे अशा घटनांमुळे वीजपुरवठा विस्कळीत झाला. मात्र, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही महावितरणच्या अभियंते, तंत्रज्ञ आणि जनमित्रांनी रात्रभर काम करून सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
संगमेश्वर, देवरुख आणि साडवली उपकेंद्रांना जोडणाऱ्या ‘आरवली’ आणि ‘निवळी’ या उच्च दाबाच्या वीजवाहिन्या तालुक्याच्या वीजपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या वाहिन्या घनदाट जंगल, डोंगर-दऱ्या आणि दुर्गम भागातून जात असल्याने बिघाड शोधणे व दुरुस्ती करणे अत्यंत कठीण ठरते. त्यात ‘निवळी’ वीजवाहिनी जुनी असल्याने पावसाळ्यात बिघाडाची शक्यता अधिक असते.
मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी इन्सुलेटर, डिस्क आणि इतर उपकरणांचे नुकसान झाले, तसेच झाडांच्या फांद्या व नारळाच्या झावळ्या वीजवाहिन्यांवर कोसळल्याने दोन्ही प्रमुख वाहिन्यांमध्ये बिघाड निर्माण झाला. परिणामी अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला.
या परिस्थितीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता पावसात, अंधारात आणि दुर्गम जंगलातून मार्ग काढत बिघाडग्रस्त ठिकाणे शोधली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले हे काम पहाटे सुमारे ३ वाजेपर्यंत सुरू होते. चिखल, घसरडे रस्ते, मुसळधार पाऊस आणि धोकादायक परिस्थितीचा सामना करत त्यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
महावितरणचे कर्मचारी कोणताही सण, सुट्टी किंवा वेळ न पाहता नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी रात्रंदिवस कार्यरत असतात. प्रतिकूल हवामानातही त्यांनी दाखविलेल्या कर्तव्यनिष्ठेमुळे मोठ्या प्रमाणावरील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले.
या संपूर्ण कामाचे नेतृत्व उपकार्यकारी अभियंता अंकूश कौरवर, सहाय्यक अभियंता फारूक गवंडी, कनिष्ठ अभियंता योगीनाथ गोरे आणि लाईन फोरमन सखाराम बावधने यांनी केले. त्यांच्यासोबत संगमेश्वर, कसबा, कुरधुंडा, तुरळ आणि आरवली शाखेतील जनमित्र व तांत्रिक कर्मचाऱ्यांनीही अविरत मेहनत घेत संकटावर मात केली.

