(संगमेश्वर / एजाज पटेल)
फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रातील बेजबाबदार कारभार आता थेट रुग्णांच्या जीवावर बेतत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दुर्गम वाडीत राहणाऱ्या एका महिलेला रात्री विंचूदंश झाल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने उपचारासाठी फुणगूस आरोग्य केंद्रात आणले. मात्र, तेथे पोहोचल्यावर संपूर्ण केंद्र कुलूपबंद असून डॉक्टर व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले. त्यामुळे वेदनेने तडफडणाऱ्या महिलेची मोठी फरफट झाली.
या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी आरोग्य व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीही या केंद्राच्या अनागोंदी कारभाराबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या, वृत्तपत्रांतून तसेच सोशल मिडियामध्ये बातम्या आल्या आणि उपोषणांद्वारेही निषेध नोंदवला गेला. तरीही तालुका व जिल्हा आरोग्य प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने “प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
एकमेव आधार, पण प्रत्यक्षात निराधार व्यवस्था
फुणगूस परिसरात खासगी दवाखान्यांचा अभाव असल्याने हजारो नागरिकांसाठी हे आरोग्य केंद्रच उपचाराचे एकमेव साधन आहे. मात्र, अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी कुलूप लावलेले असणे ही अत्यंत गंभीर बाब ठरत आहे. “विहीर उशाला आणि कोरड घशाला” अशीच अवस्था रुग्णांची होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
१५ किमीची धावपळ; जाकादेवीत मिळाले उपचार
फुणगूसमध्ये उपचार न मिळाल्याने नातेवाईकांना महिलेची अवस्था पाहता तब्बल १४ ते १५ किलोमीटर दूर जाकादेवी आरोग्य केंद्र गाठावे लागले. सुदैवाने, तेथे तात्काळ आणि समाधानकारक उपचार मिळाल्याने महिलेचा जीव वाचला. मात्र, वेळेत उपचार मिळाले असते तर ही जीवघेणी धावपळ टळली असती, असे नातेवाईकांनी सांगितले.
प्रशासनाची ‘ढिम्म’ भूमिका
आरोग्य केंद्राच्या समस्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या निष्क्रियतेमुळेच संबंधित कर्मचाऱ्यांचे धाडस वाढले असून, सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची टीका होत आहे.
कारवाईसाठी बळी हवेत का?
“एखादी गंभीर दुर्घटना किंवा मृत्यू झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत. फुणगूस आरोग्य केंद्रातील निष्काळजीपणाबाबत तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. अन्यथा, उद्भवणाऱ्या परिस्थितीस पूर्णपणे प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

