(रत्नागिरी)
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ₹१ लाखांपर्यंतची थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत महामंडळाचा १०० टक्के आर्थिक सहभाग असून लाभार्थ्यांना स्वतःकडून कोणताही स्वनिधी गुंतवावा लागत नाही. जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कमाल ₹१ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. कर्जाची परतफेड चार वर्षांत (४८ समान मासिक हप्त्यांमध्ये) करावी लागणार आहे. दरमहा ₹२,०८५ इतका मुद्दल हप्ता नियमितपणे भरल्यास लाभार्थ्यांकडून कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. मात्र, एखादा हप्ता थकीत राहिल्यास त्या थकीत रकमेवर वार्षिक ४ टक्के दराने व्याज आकारण्यात येईल.
योजनेसाठी अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१ लाखांपर्यंत असावे. तसेच अर्जदाराचा सिबिल (CIBIL) क्रेडिट स्कोअर किमान ५०० असणे बंधनकारक आहे.
या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून इच्छुक उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, पाटबंधारे स्टॉप, कुंवारबाव, रत्नागिरी येथे संपर्क साधावा किंवा ०२३५२-२२८४७० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

