(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या पनवेलमधील ‘सह्याद्री संस्था (रजि.)’ या नामांकित संस्थेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मानाचा ‘सह्याद्री जीवनगौरव पुरस्कार २०२६’ बहुआयामी व्यक्तिमत्त्व अनिल जी. जाधव यांना जाहीर झाला आहे. आगामी रविवारी आयोजित एका विशेष सोहळ्यात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
अनिल जाधव यांनी सामाजिक आणि कामगार हक्कांच्या चळवळीत अविरतपणे घेतलेल्या लढ्याची आणि त्यांच्या बहुआयामी योगदानाची दखल घेऊन या जीवनगौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. ‘बेस्ट’ (BEST) उपक्रमातून सन्मानपूर्वक निवृत्त झाल्यानंतरही अनिल जाधव यांनी कामगारांच्या हक्कांचा लढा थांबवला नाही. नोकरीत असताना आणि निवृत्तीनंतरही कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांनी नेहमीच आक्रमक आणि लढवय्यी भूमिका घेतली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांसाठी तयार केलेल्या कामगार कायद्यांचा त्यांचा सखोल अभ्यास असून, या कायद्यांचे सूक्ष्म विश्लेषण करून त्यांनी कामगार वर्गाला त्यांचे हक्क मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
केवळ प्रत्यक्ष संघर्षापुरते मर्यादित न राहता जाधव यांनी आपल्या धारधार लेखणीच्या माध्यमातून सातत्याने समाजप्रबोधन केले आहे. विविध सामाजिक आणि कामगार प्रश्नांवर त्यांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण लेख समाजमनाला विचार करायला लावणारे ठरले आहेत. कोणत्याही विषयाचा उथळ अभ्यास न करता, त्याच्या मुळाशी जाऊन अत्यंत चिकित्सक पद्धतीने अभ्यास करण्याची त्यांची हातोटी सर्वपरिचित आहे. ही सखोल आणि टोकदार अभ्यासपद्धती अनेकांना कदाचित रुचत नसली, तरी याच चिकित्सक वृत्तीने त्यांच्या यशाला आणि व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे.
सामाजिक कार्यात वावरताना अनेकदा कायदेशीर अडचणी किंवा केसेस अंगावर घ्याव्या लागल्या, तरीही त्यांनी कधी पाऊल मागे घेतले नाही. त्यांची हीच संघर्षाची जिद्द, चिकाटी आणि कणखर वृत्ती आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. याच निस्पृह सेवेची दखल घेत सह्याद्री संस्थेने त्यांना सर्वोच्च सन्मानाने गौरविण्याचे निश्चित केले आहे. या पुरस्कार घोषणेबद्दल विविध सामाजिक व राजकीय स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


