(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील कोकणनगर ते शिवरेवाडी मार्गावर अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा संशय असलेला ब्राऊन हेरॉईन (टर्की) सदृश पदार्थ पोलिसांनी जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईत दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, मोबाईल आणि दुचाकीसह एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास कोकणनगर ते शिवरेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर अजिजा बिल्डिंगच्या बाजूला करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, नायाब इरफान खलपे (वय २७, रा. कीर्तीनगर, मजगाव रोड, रत्नागिरी) आणि अरबाज अबरार फकीर (वय ३०, रा. उक्ताड, फकीर मोहल्ला, चिपळूण) हे दोघे ब्राऊन हेरॉईन (टर्की) सदृश अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने ताब्यात बाळगत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून ४ ग्रॅम निव्वळ वजनाचा अंमली पदार्थ जप्त केला. त्याची किंमत ८० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय पदार्थ ठेवण्यासाठी वापरलेल्या दोन रिकाम्या प्लास्टिक पिशव्या, पुड्या बांधण्यासाठी वापरलेले १०० कागदाचे तुकडे, एक वनप्लस नॉर्ड सीई २ आणि एक ओप्पो ए५५ असे दोन मोबाईल हँडसेट तसेच बजाज पल्सर २२० मोटारसायकल (एमएच ०८ एयू ३६९२) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या सर्व साहित्याची एकूण किंमत २ लाख ४० हजार रुपये आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश राजेंद्र सावंत यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८ (क), २१ (अ) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना १६ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३९ वाजता अटक करण्यात आली असून, पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.


