( रत्नागिरी /प्रतिनिधी )
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा शाळेजवळील तीव्र उतारावर वारंवार अपघात होत असताना महिनोनमहिने महामार्ग प्राधिकरण विभाग, जिल्हा प्रशासन आणि संबंधित ठेकेदार शांत बसल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र सोमवारी (ता. ४) एलपीजी गॅस टँकरचा जीवघेणा अपघात झाल्यानंतर अखेर प्रशासन झोपेतून जागे होत त्यांनी तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या. ग्रामस्थांच्या रास्तारोको आक्रोशानंतर प्रशासनाला ‘शहाणपण’ सुचल्याचे बोलले जात आहे.
या तीव्र उतारावर सोमवारी नियंत्रण सुटलेल्या गॅस टँकरने चार दुचाकी आणि एका टपरीचा चुराडा केला. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र काही दिवसांपूर्वी याच भागातील एक अवघड वळणाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात गॅसगळती होऊन मोठा अनर्थ टळला होता. या भागात वारंवार दुर्घटनांमुळे ग्रामस्थांनी रस्ता पूर्ण होईपर्यंत अवजड वाहतूक थांबवावी, उतार कमी करावा, वाहतुकीसाठी सुरक्षारक्षक नेमावा आणि ठेकेदाराला घटनास्थळी बोलवावे, अशा ठाम मागण्या केल्या. अखेर ठेकेदार आणि प्रशासनाने घटनास्थळी हजेरी लावून अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांना मान्यता दिली. पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनीही परिवहन आणि महामार्ग अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन अवजड वाहनांवरील नियंत्रणासाठी तात्काळ पावले उचलण्याचे आदेश दिले.
पोलिस अधीक्षकांनी आदेश दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच (दिनांक ५ ऑगस्ट) ठेकेदाराने झाडे तोडणे, रस्त्याचे रुंदीकरण आणि तीव्र उतारावर भराव टाकणे अशी कामे सुरू केली. दोन्ही बाजूंना वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी नेमले गेले. परंतु, हे सर्व अपघात घडल्यानंतरच सुरू झाल्याने “प्रशासन अपघाताचीच वाट पाहत होते का?” असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
ठेकेदाराचा घाईगडबडीचा प्रयोग, टिकणार की उखडणार?
या भागातील महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असल्याने, शाळेजवळच ठेकेदाराने माती टाकून एक तीव्र उतार तयार करण्याचा “नवा विक्रम” केला आहे. आधीच हातखंबा घाट सेक्शन आणि येथील वळणे हे डेंजर स्पॉट म्हणून ओळखले जात असताना, नव्याने तयार झालेला हा तीव्र उतार वाहनचालकांसाठी आणखी डोकेदुखी ठरत आहे. या मातीच्या रस्त्यावर आता घाईघाईत डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र हे डांबरीकरण खरोखर टिकते की काही दिवसांत उखडून जाते, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

