(रत्नागिरी)
शहरातील थिबा पॅलेस येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील परिसरात अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका तरुणाला रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. या कारवाईत संशयिताकडून सुमारे ४२ हजार रुपये किमतीचा ३.५ ग्रॅम ब्राऊन शुगरसदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
अयुब निजाम कोतवडेकर (वय २९, रा. राजीवडा, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई शनिवारी (४ जुलै) सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक परिसरात गस्त घालत असताना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील बाजूस एक तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे असलेल्या पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीत खाकी रंगाचा ब्राऊन हेरॉइनसदृश अंमली पदार्थ आढळून आला.
या पदार्थाचे वजन ३.५ ग्रॅम असून प्लास्टिक पिशवीसह एकूण वजन ६.५ ग्रॅम होते. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची बाजारभावानुसार अंदाजे किंमत ४२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल निलेश शिंगवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रविवारी (५ जुलै) संशयिताला अटक करण्यात आली असून पुढील तपास शहर पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहायक पोलिस फौजदार दीपक साळवी, पोलिस हवालदार भालचंद्र मयेकर तसेच पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांच्या पथकाने केली.
रत्नागिरी शहरात अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराविरोधात पोलिसांकडून कारवाई मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

