(खेड / रत्नागिरी)
कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता डोंगराळ भागांना बसू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री भीषण भूस्खलनाची घटना घडली. संततधार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग अचानक तीन घरांवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. डोंगरावरून मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि मलबा शेलार कुटुंबाच्या घरावर कोसळला. या दुर्घटनेत घराचा काही भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून घरातील तीन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे ७५ वर्षीय कल्पना शेलार यांची ढिगाऱ्याखालून सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी कळबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मात्र, या दुर्घटनेत ८५ वर्षीय शांताराम बाळा शेलार आणि ३५ वर्षीय सतीश शेलार यांची माहिती मिळत नसून त्यांचा शोध सुरू आहे. मुसळधार पाऊस, निसरडी जमीन आणि डोंगरावरील माती सैल झाल्यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.
घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार, खेड पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे.
शेलारवाडीतील धोकादायक घरांचा आढावा
दरम्यान, प्रशासनाने शेलारवाडी परिसरातील काही घरे धोकादायक घोषित केली असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अतिवृष्टीच्या काळात डोंगर उतार, नदी-नाले आणि दरडप्रवण भागात जाणे टाळण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर भीती व्यक्त केली असून, “असा पावसाचा रौद्र अवतार आयुष्यात पहिल्यांदाच पाहत आहोत,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध लागेपर्यंत बचावकार्य सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील डोंगराळ भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

