(लांजा / प्रतिनिधी)
लांजा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांचा उद्रेक अखेर रस्त्यावर दिसून आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी महावितरणच्या लांजा उपविभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. “आश्वासनांचा खेळ थांबवा, अखंड वीज द्या,” अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी मांडली.
रत्नागिरी उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. जवळपास दोन तास चाललेल्या तणावपूर्ण चर्चेनंतर उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांनी लांजा शहरासह तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा येत्या १५ दिवसांत सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कारभारावर जोरदार टीका करत, सततच्या वीज खंडितीमुळे नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाल्याचे सांगितले. वीज नसल्याने पाणीपुरवठा ठप्प होत आहे, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे, शेतकऱ्यांच्या शेतीकामांना अडथळे निर्माण होत आहेत, तर व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.
रविंद्र डोळस यांनी महावितरणला स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले, “१५ दिवसांत परिस्थिती सुधारली नाही, तर महावितरण कार्यालयाला घेराव घालून तीव्र जनआंदोलन उभारले जाईल. नागरिकांचा संयम संपत चालला आहे. आता केवळ आश्वासनांनी नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून उत्तर द्यावे लागेल.” या आंदोलनात तालुकाप्रमुख युवराज हांदे, युवासेना तालुका अधिकारी अभिजित राजेशिर्के, उपशहरप्रमुख प्रकाश (बाबू) गुरव, पुनसचे सरपंच संतोष लिंगायत, रिंगणेचे सरपंच संजय आयरे, उपविभाग प्रमुख राजेंद्र सुर्वे, उपसरपंच विघ्नेश गुरव यांच्यासह विविध गावांतील पदाधिकारी, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.
महावितरणने दिलेले १५ दिवसांचे आश्वासन प्रत्यक्षात उतरते की पुन्हा एकदा नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली जाते, याकडे आता संपूर्ण लांजा तालुक्याचे लक्ष लागले आहे. वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर येत्या काही दिवसांत हा जनक्षोभ अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

