(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच महागाईने प्रसादाच्या ताटातही प्रवेश केला आहे. मिठाई तयार करण्यासाठी लागणारी साखर, दूध, तूप, खवा, मैदा, बेसन, सुकामेवा तसेच इंधनाच्या वाढलेल्या दरांचा थेट फटका मिठाईच्या किमतींना बसला असून, विविध प्रकारच्या मिठाईच्या दरात तब्बल १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात बाप्पाला नैवेद्य दाखविण्यासाठी मिठाई खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या बजेटचे गणित बिघडण्याची चिन्हे आहेत.
घरोघरी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वर्षभर आतुरतेने वाट पाहिलेल्या गणरायासह गौरीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी लाडू, पेढे, बर्फी, जिलेबी यांसह विविध मिठाईची खरेदी केली जाते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनही महाप्रसाद आणि प्रसाद वाटपासाठी मोठ्या प्रमाणावर लाडू, पेढे आणि जिलेबीची मागणी असते. मात्र, यंदा वाढलेल्या दरांमुळे ‘किलोभर मिठाई’ऐवजी ‘पाव किलोत भागवा’ अशी वेळ ग्राहकांवर येण्याची शक्यता आहे. विशेषतः तूप, सुकामेवा आणि अन्य महागड्या घटकांचा वापर असलेल्या मिठाईच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.
मिठाईच्या बाजारपेठेत जवळपास सर्वच प्रकारांच्या किमती वाढल्या आहेत. तुलनेने स्वस्त मानल्या जाणाऱ्या पेढा, जिलेबी, बुंदी लाडू यांच्यापासून काजू कतली, अंजीर बर्फी, मँगो बर्फी आणि ड्रायफ्रूट बर्फीपर्यंत ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. सध्या पेढ्यांचे दर साधारण ६०० ते ८०० रुपये किलो, तर जिलेबीचे दर २०० ते २५० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. बुंदी लाडूसाठीही १५ ते २० रुपये प्रति नग मोजावे लागत आहेत. त्यामुळे पूर्वी सहज परवडणाऱ्या प्रसादासाठीही आता ग्राहकांना खरेदीपूर्वी खिशाचा अंदाज घ्यावा लागत आहे.
ऐन सणासुदीत महागाईची कुऱ्हाड
मिठाईच्या उत्पादनात दूध, खवा, तूप आणि साखरेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चात भर पडली आहे. त्यातच इंधनाच्या वाढलेल्या दरामुळे वाहतूक आणि उत्पादन खर्चही वाढला आहे. परिणामी त्याचा भार अंतिमतः ग्राहकांच्या खिशावर पडत आहे. गणेशोत्सवानंतर दसरा आणि दिवाळी हे मोठे सण पाठोपाठ येणार आहेत. त्यामुळे आगामी काळात मिठाईला मोठी मागणी राहणार आहे. मात्र, वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सणांचा उत्साह आणि महागाईची झळ यांचा सामना ग्राहकांना एकाच वेळी करावा लागणार आहे. महागाईने आधीच घरगुती खर्चाचे गणित बिघडविले असताना आता बाप्पाच्या नैवेद्यासाठीही अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबे प्रमाण कमी करून प्रसादाची खरेदी करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.
एफडीएच्या कारवायांमुळेही खर्चात भर?
मिठाई तयार करताना दर्जेदार आणि सुरक्षित कच्चा माल वापरण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी आणि कारवाई केली जाते. त्यामुळे विक्रेत्यांकडून गुणवत्तेबाबत अधिक काळजी घेतली जात असल्याचे सांगितले जाते. त्याचा उत्पादन खर्चावर परिणाम होत असल्याचे मिठाई विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून महाप्रसादासाठी मोठ्या प्रमाणावर लाडू, पेढे आणि जिलेबीच्या ऑर्डरी दिल्या जातात. मात्र, यंदाच्या दरवाढीमुळे मंडळांनाही वाढीव बजेटची तरतूद करावी लागण्याची शक्यता आहे. घरगुती गणपती आणि गौरीच्या नैवेद्यासाठीही मिठाई खरेदी करावी लागणार असल्याने सर्वसामान्य कुटुंबांच्या खर्चात भर पडणार आहे. बाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठ सजली असली तरी मिठाईच्या वाढलेल्या दरांनी ग्राहकांच्या खिशाला मात्र चांगलाच चटका दिला आहे. ‘गणरायाला प्रसाद किती दाखवायचा?’ यापेक्षा ‘दर परवडणार किती?’ हा प्रश्नच यंदा अनेकांच्या गणेशोत्सवाच्या बजेटसमोर उभा ठाकला आहे.

