(रत्नागिरी)
रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाऊन, इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आणि शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात स्वयंसेवक आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून २३ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.
रोटरी परिवाराचे नवीन वर्ष १ जुलैपासून सुरू झाले असून, त्याची सुरुवात समाजोपयोगी उपक्रमाने व्हावी या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीतील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
शिबिरात मत्स्य महाविद्यालय व मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्वयंसेवकांसह इनर व्हील क्लबचे सदस्य आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सुमारे ६० स्वयंसेवकांची रक्तगट तपासणी करण्यात आली. त्यापैकी २३ जण रक्तदानासाठी पात्र ठरले आणि त्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे यांनी रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाऊनचे अध्यक्ष डॉ. संदीप करे, सचिव सिताराम सावंत, दादा कदम, डॉ. वामन सावंत, अमर आयरे, हिराकांत साळवी, आकांक्षा साळवी तसेच मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. संदेश पाटील यांनी इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या अध्यक्षा सुवर्णा चौधरी, सदस्य डॉ. प्रियांका कांबळे, श्रद्धा सावंत, प्रज्ञा गांधी, सोनाली आयरे तसेच वैद्यकीय पथकाचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांनी स्वयंसेवकांना रक्तदानाचे महत्त्व आणि त्याचे सामाजिक मूल्य याविषयी मार्गदर्शन केले.
रक्तदात्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देऊन गौरविण्यात आले. हे वितरण विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. डबीर पठाण आणि प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. संदेश पाटील, डॉ. सुशील कांबळे, क्रीडा अधिकारी डॉ. मंगेश पाटील, प्राध्यापक तौसिफ काझी, निलेश मिराजकर, मयुरी डोंगरे तसेच सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व आयोजकांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करून त्यांच्या समाजाभिमुख योगदानाबद्दल आभार व्यक्त केले.

