(रत्नागिरी)
रत्नागिरीतील गुंबद-सैतवडे येथील गुंबद मोहल्ल्यात ईद-उल-फितर (रमजान ईद) मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. गुंबद मस्जिदमध्ये आज सकाळी आठ वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली.
नमाजानंतर रमजान महिन्यात पूर्ण महिना रोजे पाळणाऱ्या, विशेषतः पहिल्यांदाच रोजा ठेवणाऱ्या लहान मुलांकडून सर्वांना नियाज वाटण्यात आली. यानंतर मोहल्ल्यातील नागरिकांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि आनंद साजरा केला.
संपूर्ण रमजान महिन्यात पाच वेळा नमाज तसेच तरावीह नमाजमध्ये इमामत करणारे इमाम साहेब, हाफिज साहेब आणि बंगी साहेब यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना मनःपूर्वक मुबारकबाद देत कृतज्ञता व्यक्त केली.
ईदच्या नमाजासाठी मोहल्ल्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या संपूर्ण आयोजनासाठी गुंबद मोहल्ला जमात सदस्यांनी महिनाभर परिश्रम घेतले होते, ज्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

