(रत्नागिरी)
छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा साखळकर हिने कास्यपदकाची कमाई केली. क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने 13 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान 14, 17 आणि 19 वर्षे वयोगट यांच्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल गारखेडा जिल्हा संभाजीनगर येथील बॅडमिंटन हॉल येथे मोठ्या दिमाखात पार पडल्या.
या स्पर्धेसाठी राज्यभरातून अमरावती पुणे कोल्हापूर संभाजीनगर नाशिक मुंबई नागपूर लातूर अशा आठ विभागातून सुमारे 450 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. स्वरा साखळकर हिने 14 वर्षाखालील मुलींमध्ये 38 किलो खालील वजनी गटामध्ये कांस्यपदकाची कमाई केली.
राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी स्वरा हिला SRK तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक श्री शाहरुख सर यांचे मोलाचं मार्गदर्शन लाभले. स्वरा ही नगरपरिषद शाळा क्रमांक 15 दामले विद्यालयाची विद्यार्थिनी असून इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे.
तिच्या या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय शिंदे तालुका क्रीडा अधिकारी गणेश जगताप तालुका समन्वयक विनोद मयेकर महाराष्ट्र राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष श्री व्यंकटेशराव कररा, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा तायक्वांदो प्रशिक्षक मिलिंद भागवत मुख्याध्यापक, श्री मोटे, पालक, क्रीडाशिक्षक श्री शेंडगे तसेच संस्थेचे संचालक, तायक्वांदो क्लबचे सर्व पदाधिकारी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.

