(लांजा)
लांजा तालुक्यातील माचाळ परिसरात रविवारी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास प्रवासी बस कलंडल्याची घटना घडली. या बसमध्ये सुमारे ३२ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बस (क्रमांक एमएच ०८ ई ९४१२) माचाळ मार्गावरून प्रवास करत असताना अचानक नियंत्रण सुटल्याने ती कलंडली. अपघाताचा नेमका क्षण इतका अचानक होता की प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यास मदत केली. काही प्रवाशांना किरकोळ मार बसल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उर्मिला शिडे, नयना राणे आणि विष्णू मांजरेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणत पाहणी केली आणि प्रवाशांना आवश्यक ती मदत पुरवली. अपघातानंतर बस बाजूला कलंडलेल्या अवस्थेत असल्याने काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
सदर बस कलंडण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रस्त्याची स्थिती, चालकाचे नियंत्रण किंवा तांत्रिक बिघाड यापैकी कोणते कारण जबाबदार आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
घटनेची माहिती महेश पाटील यांनी लांजा पोलीस स्थानकात दिली असून पुढील तपास सुरू आहे.

